Raj Thackeray | बिनशर्त पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजपाकडून डॅमेज कंट्रोल सुरू?

0

मुंबई: Raj Thackeray | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. देशात एनडीएला (NDA Govt) बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी देशविदेशातील नेते उपस्थित होते.

एनडीएतील नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. असे असताना पंतप्रधान मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र अनेकांना खटकली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. महायुतीच्या नेत्यांसाठी त्यांनी जाहीर सभादेखील घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते, त्यामुळे ते जिंकून आल्याचा दावाही मनसैनिकांनी केला.

निकाल लागला. एनडीएला बहुमत मिळाले. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला. यात देशभरातील व्यावसायिकांसह, बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील दिसले. दरम्यान राज ठाकरेंना या सोहळ्याचे निमंत्रण नव्हते.

लोकसभा निवडणुका संपल्यानंतर मात्र, भाजपची भूमिका बदलल्याचा सूर मनसेमधून उमटतोय. लोकसभेनंतर मनसेनं विधानपरिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यानुसार, अभिजीत पानसेंना मनसेकडून कोकण पदवीधरसाठी उमेदवारीही जाहीर करण्यात आली.

भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे मनसेनं जाहीर केलेल्या उमेदवारीनं अडचणी वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर भाजपनं राज ठाकरेंची मनधरणी केली. राज ठाकरेंनी भाजपच्या विनंतीचा मान राखून अभिजीत पानसेंची उमेदवारी मागे घेतली.

राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान घाईमध्ये निमंत्रण द्यायचं राहिलं असेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.

वरिष्ठांच्या कानावर हे टाकलं जाईल, घाईगडबडीत राहिलं असेल. काहींना निमंत्रण जात नाही, मात्र याची नोंद केंद्रीय पक्षाने घेतली पाहिजे’ असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.