Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : फोटो मॉर्फ करुन खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक, पोलिसांकडून कोलकाता येथील कॉल सेंटर उध्वस्त; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime Branch | गुगलवर कॉलगर्लच्या (Call Girl) नावाने खोटे मोबाईल नंबर अपलोड करुन ऑनलाईन खंडणी (Extortion Case) मागणाऱ्या कोलकता पश्चिम बंगाल येथील कॉल सेंटर (Call Center) उध्वस्त करुन कॉल सेंटर चालवणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक आणि दिघी पोलीस ठाण्यातील (Dighi Police Station) तपास पथकाने संयुक्त केली. अटक केलेल्या आरोपींकडून 4 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सुरजकुमार जगदीश सिंग (वय-27), नविनकुमार महेश राम (वय-23), सागर महेंद्र राम (वय-23), मुरली हिरालाल केवट (वय-24), अमरकुमार राजेंद्र राम (वय-19), धिरनकुमार राजकुमार पांडे (वय-25 सर्व रा. उदयान सोसायटी, नया पट्टी रोड, दुर्गाबती कॉलनी, कोलकता, पश्चिम बंगाल मुळ रा. झारखंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सौरभ शरद विरकर (वय-26) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी फिर्यादी यांचा मावस भाऊ किरण नामदेव दातिर (वय-35 रा. डुडुळगाव) याच्या हॉट्सअॅपचा डीपी काढून त्याचा फोटो मॉर्फ करुन त्याला व्हॉट्सअॅपवर पाठवला. तसेच त्याला ब्लॅकमेल करुन 12 हजार रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरुन फोन करून 51 लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीतर फोटो गुगलवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. आरोपींकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने फिर्यादी यांचा मावस भाऊ किरण दातिर याने 15 मे रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील हॉलमधील फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. खंडणी विरोधी पथक आणि दिघी पोलीस गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलिसांनी आरोपी वापरत असलेल्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी निष्पन्न केले. 7 जून रोजी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कोलकाता येथे रवाना करण्यात आले.

पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी नगेर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समजले. पथकाने परिसरात शोध घेऊन नया पट्टी रोड, दुर्गाबत्ती कॉलनी येथील कॉल सेंटरवर छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून 15 स्मार्टफोन, 7 व्हॉइस चेंज मोबाईल, 40 सिम कार्ड, 14 पेमेंट डेबीट कार्ड, 8 आधार कार्ड-पॅन कार्ड, 8 नोटबुक असा एकूण 4 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत

आरोपी नवीन सिमकार्ड खरेदी करुन जि-मेल वर बनावट नावाने खाते तयार करत होते. त्या आधारे गुगलवर भारतातील वेगवेगळ्या शहरातील कॉलगर्लच्या नावाने मोबाईल नंबर अपलोड करत होते. त्यावर फोन आल्यानंतर कॉलगर्ल पुरवण्याच्या नावाखाली स्वत: च्या बँक खात्यात पैसे स्वीकारत होते. बळिताचा मोबाइल नंबर प्राप्त करुन त्याच्यासोबत आय-किल कंपनीच्या व्हाईसचेंज मोबाईल द्वारे महिलेच्या आवाजात बोलत होते. बळितांच्या मोबाईल नंबर वरून त्यांचे सोशल मिडीयावरुन फोटो मिळवून ते मॉर्फ करुन त्यालाच पाठवत असत. त्यानंतर त्याला वारंवार फोन करुन पैशांची मागणी करत होते. कोणी तक्रार करु नये यासाठी आरोपी फक्त पाच ते दहा हजार रुपये मागत होते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त भोसरी एमआयडीसी विभाग डॉ. सचिन हिरे, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन अंभोरे, पोलीस अंमलदार किशोर कांबळे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.