Shivsena-BJP | मंत्रिपदावरून एनडीएत वाद पेटला? भाजपाने दुजाभाव केल्याने शिंदे गटाकडून नाराजी

0

पुणे: Shivsena-BJP | एनडीएने केंद्रात सरकार (NDA Govt) स्थापन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे.

मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नेत्यांमध्ये मात्र नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे.राज्यात मानाचं पान मिळवणाऱ्या शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना केंद्रात सत्तेत न्याय्य वाटा मिळाला नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

बारणे म्हणाले, “देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं मंत्रिमंडळ स्थापित झाले आहे. या निवडणुकीचा जर विचार करता शिवसेना पक्ष जुना साथी आहे. एनडीएचा जुना साथी म्हणून शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्री मिळावे ही माफक अपेक्षा होती.

चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार निवडून आले, त्याचबरोबर नितेश कुमार यांचे 12 खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे सात खासदार निवडून आले. चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. कुमारस्वामी यांचे दोन खासदार कर्नाटकातून निवडून आले, त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद दिले.

त्याचबरोबर बिहार मधून जितन मांझी एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. तर शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळावे, अशी आमची अपेक्षा होती. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ आमच्या खासदाराने घेतली असती तर आम्हाला समाधान मिळाले असते”, असे श्रीरंग बारणे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.