Pune PMC News | परवाना असलेले होर्डीग्जमध्येही अनियमितता ! अन्य विभागातील अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे आकाशचिन्ह विभागातील निरीक्षक धास्तावले

0

पुणे : Pune PMC News | शहरातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डींग्जबाबत (Unauthorised Hoardings In Pune) महापालिका प्रशासन अधिकच कठोर झाले आहे. शहरातील नियमबाह्य होर्डींग शोधण्यासाठी अन्य विभागातील कर्मचार्‍यांची मदत घेउन सर्वेक्षण केल्यानंतर तब्बल १५० परवाना दिलेली होर्डींगही नियमबाह्य असल्याचे समोर आल्याने सर्व अधिकृत होर्डींग्जचे फोटोच आयुक्तांनी मागविले आहेत. पुढील पंधरा दिवसांत हे होर्डींग नियमानुसार न झाल्यास संबधित होर्डींगचे मालक आणि आकाशचिन्ह परवाना विभागाच्या (Sky sign and Licence Department) निरीक्षकांवरही कारवाई करण्याचे सूतोवाच महापालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांनी शहरातील होर्डींग्जबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व निरीक्षक उपस्थित होते. तत्पुर्वी अन्य विभागातील अधिकार्‍यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या होर्डींग्जचा अहवाल आणि फोटोच बैठकीत दाखविण्यात आले. हे सर्व फोटोग्राफ्स हे अधीकृत परवाना दिलेल्या होर्डींग्जचे असले तरी त्यांचे आकार, चौकापासूनचे अंतर आदी बाबींमध्ये नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील सुमारे दोन हजार सहाशे परवाना असलेल्या होर्डींग्जचे फोटो काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.परवाना दिलेले होर्डींगमध्ये नियमांचे पालन झालेले नसल्याचे निदर्शनास आल्याने आकाशचिन्ह विभाग अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

परवाना देताना होर्डींग्जची तापसणी केली गेली नसल्याचे समोर येत असल्याने आयुक्तांनी संबधित अधिकार्‍यांना दम भरला आहे. पुढील पंधरा दिवसांत सर्व होर्डींग्ज नियमात व्हायला हवीत, अन्यथा संबधितांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी सुनावल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.