PMC Action On Illegal Construction In Koregaon Park | कोरेगाव पार्क येथील 7 नंबर लेनमधील तीन हॉटेलसह 50 हजार चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त (Video)

0

पुणे : PMC Action On Illegal Construction In Koregaon Park | महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने (Pune Municipal Corporation – PMC) कोरेगाव पार्क येथील गल्ली क्र. सातमधील संगमवाडी टी.पी.स्किममधील (Sangamwadi TP Scheme) भुखंड क्र. ४०५ वर असलेल्या बेकायदा दोन हॉटेलसह अन्य व्यावसायीक शेडस् आणि क्रिकेट टर्फच्या शेडवर कारवाई करत सुमारे ५० हजारांहून अधिक चौरस फुटांचे क्षेत्र रिकामे केले. विशेष असे की, येथील व्यावसायीकांनी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यातील स्थगिती उठताच महापालिकेने ही कारवाई केली. येथील गेल्या काही वर्षांचे अतिक्रमण काढल्याने स्थानीक नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

कोरेगाव पार्क येथील सात नंबर लेनमधील भूखंडावर हॉटेल चूल मटण, हॉटेल बारबंका कॅफे किचन, पालमोको डाईन, ड्रिंक, डान्स, पूजा फ्रुट ऍन्ड व्हेजिटेबल, लजिज चिकन सेंटर, मसल बार जिमसह क्रिकेट टर्फ शेड उभारण्यात आले होते. अर्धवट बांधकाम आणि पत्र्यांचे शेड उभारताना महापालिकेची परवानगी घेतलेली नव्हती. महापालिकेने येथील व्यावसायीकांना यापुर्वीच नोटीस दिली होती. त्याविरोधात व्यावसायीकांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती आदेश मिळविला होता. न्यायालयाने नुकतेच ही स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेने आज सकाळीच जेसीबी, जॉ कटरसह मोठ्या मनुष्यबळाच्या सहाय्याने कारवाईला सुरूवात केली. यावेळी व्यावसायीकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतू महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी पोलिस बंदोबस्तामध्ये सुमारे ५० हजार चौ.फुटांहून अधिकचे बांधकाम आणि शेड पाडून टाकले.

   येथील हॉटेल व्यावसायीकांनी अग्निशामक दलाची परवानगी घेतलेली नव्हती. तसेच पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने येथे येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतुकीची कोंडी देखिल होत होती. यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. याविरोधात तक्रारी आल्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली. महापालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पुढील काळात येथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

पोलिस बंदोबस्त देण्यास टाळाटाळ

महापालिकेच्या बांधकाम विभागाचे पथक यंत्र सामुग्रीसह सकाळीच कोरेगाव पार्क येथे हजर झाले. परंतू कोरेगाव पार्क पोलिसांकडून त्यांना पोलिस बंदोबस्त देण्यास विलंब झाला. अखेर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर बंदोबस्त उपलब्ध करून दिला गेला, अशी महिती महापालिकेतील कर्मचार्‍यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.