Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : व्हेल माशाच्या ‘उलटी’ची तस्करी, दोघांना अटक; सव्वातीन कोटींचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | अतिशय दुर्मिळ असलेल्या व्हेल माशाची ‘उलटी’ म्हणजेच ‘अंबरग्रीस’ तस्करी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 3 कोटी 27 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वनरक्षक विभागाने शनिवारी (दि.22) बावधन येथील रानवारा हॉटेलसमोर केली.
किशोर यशवंत डांगे (वय-42 रा. मालगुंड ता.जि. रत्नागिरी), संदीप शिवराम कासार (वय-62 रा. सुभाष रोड, मालगुंड, ता. रत्नागिरी) यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39,44, 48, 49 (ब),57,51, आयपीसी 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मुळशी वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक सारीका बन्सी दराडे (वय-31) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर हा ड्रायव्हर असून संदीप याची शेती तसेच हॉटेलचा व्यवसाय आहे. आरोपी व्हेल माशाच्या ‘उलटी’चा तुकडा कोणत्याही परवानगीशिवाय विक्री करण्यासाठी पुण्यात घेऊन आले होते. याबाबत माहिती मिळताच मुळशी वन परिक्षेत्र विभागाने बावधन येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ सापळा कारवाई करुन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून व्हेल माशाची ‘उलटी’ तसेच इतर साहित्य असा एकूण 3 कोटी 27 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
व्हेल माशाच्या ‘उलटी’चा उपयोग
व्हेल माशाची ‘उलटी’ सुगंधी आणि खूपच महाग असते. या एक किलो ‘उलटी’ची किंमत अंदाजे एक ते दीड कोटी रुपये एवढी असते. ही ‘उलटी’ अतिशय दुर्मिळ असते. याचा उपयोग महागडे परफ्युम बनवण्यासाठी होतो. साधारण परफ्यूमचा सुगंध काही तासातच उडून जातो. मात्र, त्यात जर व्हेल माशाच्या ‘उलटी’चा (अंबरग्रीस) मिसळले तर त्या परफ्युमचा सुगंध बराच काळपर्यंत राहतो. तसेच आयुर्वेद औषधी मध्ये व युनानी औषधांमध्ये याचा उपयोग होतो. फ्रांस तसेच अरब देशांत याला प्रचंड मागणी आहे.