Sharad Pawar | लोकसभेच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, भाजपचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला

0

मुंबई: Sharad Pawar | ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी (Lok Sabha Election Counting) असणार आहे. देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे चित्र नेमके काय असणार याबाबत विविध दावे केले जात असताना त्याचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.

लोकसभेच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकांनंतर आगामी विधानसभा निवडणुकांची (Vidhan Sabha Election Maharashtra) तयारी असणार आहे. या पार्श्वभूमीवर जागेबाबत अनेकांनी चाचपणी सुरु केल्याचेही चित्र दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार यांची साथ सोडून गेलेले अनेक नेते परततील, अशी चर्चा आहे. मात्र, आता भाजपचाच बडा नेता शरद पवारांच्या भेटीला पोहोचला आहे.

लोकसभेच्या निकालावर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच बरीच गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे उद्याच्या निकालानंतर महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे आकाराला येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

मात्र, आता लोकसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच आमदारकीसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांनी संबंधित पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) उदगीर विधानसभा मतदारसंघातील (Udgir Vidhan Sabha) माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुधाकर भालेराव हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. सध्या उदगीर विधानसभेत राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार आहेत. सुधाकर भालेराव आणि शरद पवार यांच्यातील चर्चेचा नेमका तपशील उपलब्ध झालेला नाही.

मात्र, महायुतीत सध्याच्या आमदारांनाच पुन्हा विधानसभेची तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात घेत माजी आमदारांनी पर्यायांची चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.