Pune Municipal Corporation (PMC) | महापालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर; विकासकामांच्या फायली गहाळ झाल्या की केल्या?

PMC

पुणे: Pune Municipal Corporation (PMC) | महापालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (Yerwada Kshetriya Karyalay) झालेल्या विविध विकास कामांच्या फायली गहाळ झाल्याचे समोर आले आहे. (Pmc Ward Office in Yerawada)

माहिती अधिकार कार्यकर्ते संचल कदम (Sanchal Kadam RTI) यांनी २०१८ मध्ये निविदा क्रमांक २८ नुसार ड्रेनेज साफसफाई आणि दुरुस्ती करणे, २०१५ मधील निविदा क्रमांक ४१ नुसार येरवडा स्मशानभूमीमधील कामे आणि निविदा, नवीन ड्रेनेज वाहिन्या टाकण्याच्या कामांची माहिती मागवली होती.

यावर या कामांच्या फायली कार्यालयातून गहाळ झाल्याचे उत्तर पालिकेने कदम यांना दिले. त्यामुळे कदम अपिलात गेले. तेथेही त्यांना फायली गहाळ झाल्याचे उत्तर देण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्ते कदम यांनी राज्य माहिती अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यावर पालिकेला विचारणा करण्यात आली. त्यावर पालिकेने पोलिस उपायुक्तांना पत्रव्यवहार करून कार्यालयातून गहाळ फायली शोधून देण्याची विनंती केली आहे; पण अद्याप गहाळ फायलींचा शोध लागलेला नाही.

माहिती अधिकारात कार्यकर्त्यांनी माहिती मागितल्यावर कार्यालयातून फायली गहाळ झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे पालिका प्रशासनाने ‘लॉस्ट अँड फाउंड’मध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिस उपायुक्तांना पत्रव्यवहार करून फायली शोधून देण्याची विनंती केली आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून शहरात ठिकठिकाणी विविध विकासकामे केली जातात. येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मागील अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहे.

मात्र, यामध्ये कामे अर्धवट किंवा पूर्ण झाली नसताना ठेकेदाराला कामाची रक्कम अदा करण्यात आल्याचा काही नागरिकांना संशय आहे. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संशयास्पद विकासकामांची माहिती मागितली होती.