Pune Crime News | पुणे : पोलीस आयुक्तालयासमोरून पोलिसांच्या दुचाकी चोरणारा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 गुन्हे उघड

0

पुणे : – Pune Crime News | मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहन चोरीच्या (Vehicle Theft) घटना समोर आल्या आहेत. यामध्ये कधी हौस पूर्ण करण्यासाठी वाहन चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर पुणे शहरातून दुचाकी चोरून त्याची दुसऱ्या जिल्ह्यात विक्री करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील पार्कींगमधून (Pune CP Office Parking) पोलिसांच्या (Pune Police) दुचाकी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांच्या दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) दरोडा व वाहनचोरी पथक एकने बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 90 हजार रुपये किमतीची चार वाहने जप्त केली आहेत.

विष्णु भाऊराव कुंडगीर Vishnu Bhaurao Kundgir (वय-25 सध्या रा. फिरस्ता मुळ रा. खेर्डा ता. उदगीर, जि. लातुर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 13 मे रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) आयपीसी 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार (Criminal On Police Record) असून त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल आहेत. यापैकी तीन गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती. 19 जानेवारी रोजी तो जेलमधून बाहेर आला आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा शोध घेत असताना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच आरोपीच्या नातेवाईंकांच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार विष्णु कुंडगीर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन 31 मे रोजी स्प्लेंडर दुचाकीसह ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेट नं. 3 समोरील सर्वजनिक रोडवर पार्क केलेल्या दुचाकी चोरुन नेल्याची कबुली दिली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने आणि दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून बंडगार्डन पोलीस ठाण्यातील तीन, हडपसर व भोसरी पोलीस ठाण्याती प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपीची चोरी करण्याची पद्धत

आरोपी सराईत गुन्हेगार असून तो हिरो होंडा स्प्लेंडर गाड्यांचे हॅन्डल लॉक बनावट चावीचा वापर करुन स्विच ऑन करुन त्या चोरी करुन घेवून जात होता. गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर ती गाडी त्याच ठिकाणी सोडून दुसरी दुचाकी चोरी करुन घेऊन जात होता. आरोपीने चोरीच्या दुचाकी केडगाव रेल्वे स्टेशन जवळ व फुरसुंगी येथील सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी लावल्या होत्या.

आरोपीवर 15 गुन्हे दाखल

आरोपीवर 2018 पासून 15 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये समर्थ पोलीस ठाणे -2, बंडगार्डन, चंदननगर पोलीस ठाणे – प्रत्येकी 1, हडपसर पोलीस स्टेशन 5, पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशन- 6 गुन्हे दाखल आहेत. यातील 3 गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती. 19 जानेवारी रोजी तो शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आला आहे. पुढील कार्यवाही करीता त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, रविंद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, शिवाजी सातपुते, महेश पाटील, साईकुमार कारके, नारायण बनकर यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.