Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”

0

पुणे : Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | पंधरा वर्षात शेती प्रश्नाऐवजी स्वत:च्या कंपनीसाठी संरक्षण खात्याच्या प्रश्नांनाच त्यांनी प्राधान्य दिले. सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार आणि काँट्रॅक्ट कधी निघणार हेच प्रश्न ते संसदेत विचारत होते. तब्बल ७० प्रश्न त्यांनी याबाबत विचारलेत, असा आरोप शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर केला होता. यावरून आढळराव संतापले असून त्यांनी थेट कोल्हेंना आव्हान दिले आहे. (Shirur Lok Sabha)

शिवाजी आढळराव पाटील यांनी म्हटले की, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी माझ्या कंपनीला घेऊन केलेल्या आरोपांचे आता पुरावे द्यावेत. मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो, अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडावे.

आढळराव म्हणाले, गेली तीन महिने फक्त कांदा-कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कोणतेच विषय शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे ते घाणेरडे, खालच्या पातळीचे आणि निचपणाचे आरोप करू लागलेत.

दरम्यान, आढळराव यांनी दिलेले आव्हान अमोल कोल्हे स्वीकारतात का, पुरावे देणार का, निवडणुकीच्या रिंगणातून कोण बाहेर पडणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

काय म्हणाले होते अमोल कोल्हे…

ओतूर येथील सभेत अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर आरोप केला होता की, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे उद्योजक असून त्यांचे व्यवसाय संरक्षण खात्याशी निगडित आहेत. त्यामुळे आढळराव पाटील यांनी त्यांचे व्यवसाय सांभाळण्यासाठी संरक्षण खात्याविषयी संसदेत ७० पेक्षा अधिक प्रश्न विचारले आहेत. ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विचारले.

संरक्षण विभाग कोणते सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार? कोणते कंत्राट कधी निघणार? अशा प्रकारचे प्रश्न विचारून कोणत्या कंपनीचा फायदा करण्यासाठी हे प्रश्न विचारले, त्यामुळे कोणत्या कंपनीला फायदा झाला. याची माहिती घेतल्यावर समजले की, माजी खासदार आढळराव पाटील केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेले होते.

२०१९ साली जेव्हा मी संसदेत गेलो तेव्हा माहिती घेतली की, यापूर्वी खासदार असलेल्या महोदयांनी नेमके संसदेत कोणते प्रश्न विचारले आहेत. तेव्हा समजले की, काही लोक केवळ आपला व्यवसाय करण्यासाठी संसदेत गेले.

शिरुर, जुन्नर, आंबेगाव, खेड या भागात ज्या खात्याचा काहीही संबंध नाही त्या खात्याचे संसदेत प्रश्न मांडण्याचा नेमका हेतू काय असावा. संसदेत सामान्य जनतेचे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची आवश्यकता असताना मात्र केवळ व्यापार करण्यासाठी माजी खासदार संसदेत गेले होते, असे कोल्हे यांनी म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.