विकतचे दुखणे घेऊन सरकारचे हे कसले राजकारण?; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

0
मुंबई : एन पी न्यूज 24 – कश्मीरातील परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. त्यातच आता नागरिकत्व विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांत हिंसेचा उद्रेक झाला. हे विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करीत आहे? असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केंद्र सरकारला केला आहे. मोदी सरकारच्या नागरिकत्व विधेयकावर व आसाममधील बिघडलेल्या स्थितीवरून आज सामनातून टिकेची झोड उठवण्यात आली आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, जगभरातील हिंदू समाजाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत हे सिद्ध करण्याच्या ईर्षेतून नागरिकत्व विधेयक आणले गेले, पण ३७० कलम हटवूनही कश्मिरी पंडितांची घरवापसी का होऊ शकली नाही, याचे सरकारकडे ठोस उत्तर नाही. आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्य असून तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

विधेयक मंजूर झाल्याबद्दल ज्या लोकांना आनंदाचे भरते आले आहे, ‘जितं मय्याङ्कच्या आवेशात जे लोक एकमेकांस पेढे भरवीत आहेत त्यांची कीव करावीशी वाटते. त्यांनी ईशान्येकडील राज्यांत अस्थिरतेची व अशांततेची चूड लावली. त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. जो आजार आयुर्वेद आणि योग पद्धतीने बरा करता आला असता, त्यासाठी चिरफाड करून गडबड घडवली. यामागे राजकीय डाव व मत बँकेचे राजकारण आहे, असा गंभीर आरोपही शिवसेनेने मोदी सरकारवर केला आहे.

ईशान्येसह अनेक राज्यांत उद्रेक झाला असून या विधेयकास विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे व आपल्याच नागरिकांना मागे रेटण्यासाठी सरकारने सैन्याला पाचारण केले. अनेक राज्यांत संचारबंदी लागू केली आहे. मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करून सरकारने लोकांचा लोकांशी संपर्क तोडला. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान वगैरे देशांतून आलेल्या हिंदू, जैन, शीख, पारशी, बौद्ध अशा धर्मांच्या लोकांना, शरणार्थींना देशाचे नागरिकत्व बहाल करणारे हे विधेयक आहे. त्यातून मुसलमानांना वगळले.

मुसलमानांना वगळण्याचे कारण असे देण्यात आले की, ही सर्व इस्लामी राष्ट्रे आहेत व तिथे मुसलमानांवर धार्मिक अत्याचार होत नाहीत. हिंदू, शीख, ख्रिश्चनांवर पाकिस्तान, बांगलादेशात धार्मिक अत्याचार होत आहेत हे मान्य करावेच लागेल. जे हिंदू वगैरे शरणार्थी हिंदुस्थानात आले, त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आश्रय देणे हे आपले कर्तव्यच आहे. पण हे लोक नक्की किती संख्येने येणार व त्यांना कोणत्या राज्यांत ठेवणार ते समजायला हवे.
या सगळय़ांना काही काळ मतांचा अधिकार देऊ नये हे शिवसेनेचे मत सरकारने फेटाळले. पुन्हा श्रीलंकेत तामीळ हिंदू शरणार्थींचा विषयही लटकलेला आहे. त्यावर सरकारचे मौन आहे, असे या अग्रलेखात शिवसेनेने नमूद करत मोदी सरकारच्या नागरिकत्व विधेयकातील त्रुटी दाखवून दिल्या आहेत.
visit : npnews24.com
Leave A Reply

Your email address will not be published.