Murlidhar Mohol On Pune Drugs Case | शहरातील किंवा बाहेरच्या नेत्यांनी माझ्या शहराचं नाव खराब करू नये – मुरलीधर मोहोळ

0

पुणे : Murlidhar Mohol On Pune Drugs Case | मागील काही कालावधीत हजारो कोटींचे ड्रग्स पुण्यात सापडले आहे. पोर्शे कार अपघातानंतर अनधिकृत पब, बार चा (Pubs-Bars In Pune) समोर आलेला मुद्दा, एफसी रोडवरील ड्रग्स घेतानाचा समाजमाध्यमात व्हायरल झालेला व्हिडिओ या सर्व प्रकारांमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. पुण्यातील एफसी रस्त्यावरील लिक्विड, लेजर, लाऊंज या हॉटेलमधील बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. यामध्ये पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती. या पार्टीमध्ये काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती.

दरम्यान याबाबत पोलिसांनी कारवाई केली असली तरी आता या सर्व प्रकरणावरून राजकारण पेटले आहे. आज संजय राऊत पुणे दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी पुण्याच्या ड्रग्स प्रकरणावर भाष्य केले. पोलीस आणि राजकीय पाठबळाशिवाय एवढे ड्रग्स पुण्यात सापडणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केलेली कारवाई एक नाटक होतं असं त्यांनी म्हंटले.

राऊत पुढे म्हणाले, ” गुजरात मार्गे देशातील अनेक भागात ड्रग्स पोहोचवले जात असून आपल्या राज्यात पुणे आणि नाशिक ही दोन ठिकाणं ड्रग्स ची केंद्र बनली आहेत. पुण्यात ड्रग्स प्रकरण समोर आल्यावर, बुलडोझर लावून कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे पुण्यातील ड्रग्स चा व्यवहार कमी होणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“आता पुण्याला केंद्रात मंत्री पद मिळाले आहे. मात्र पुण्याचे प्रश्नच वेगळे असून विकासासोबत सामाजिक देखील प्रश्न आहेत. लाडले भाऊ, लाडली बहीण या योजना ठीक आहेत. पण घराघरातील भाऊ ड्रग्सच्या आहारी गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याची गरज असून ड्रग्सच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांनी ड्रग्स विरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला.

या टीकेला प्रत्युत्तर देताना पुणे शहराचे खासदार केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, फर्ग्युसन रोडवरील घटना समोर येताच, संबधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. तसेच ड्रग्स प्रकरणाकरीता स्वतंत्र कक्ष स्थापन करून ड्रग्स येतात कुठून आणि वापरते कोण या सर्वांचा शोध घेतला जावा, या संदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. संबधित व्यक्ती विरोधात कारवाई देखील केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्याला काहीतरी वाटतं म्हणून उगाचच बोलायचं, कोणत्याही विषयावर बोलताना आपल्या हातामध्ये पुरावा असला पाहिजे. काही तरी संदर्भ ठोस असले पाहिजे. उगाचच रोज उठायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीका करायची, विरोधासाठी विरोध करायचा हे राज्यातील जनता सर्व पाहात आहे. त्यामुळे विरोधकांनी वैयक्तिक आकसासाठी बोलायचे थांबवा, शहरातील किंवा बाहेरच्या नेत्यांनी माझ्या शहराचं नाव कोणीही खराब करू नये, अशा शब्दात अप्रत्यक्षपणे त्यांनी संजय राऊत यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.