Ajit Pawar NCP – BJP | ‘अजित दादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका; देवेंद्रजी मला संरक्षण द्या’; भाजप नेत्याची मागणी

0

पुणे : Ajit Pawar NCP – BJP | लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी (Sudarshan Chaudhari) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत वादंग निर्माण झाला आहे. अजित पवारांना युतीतून बाहेर काढले पाहिजे अशी भावना चौधरी यांनी व्यक्त केली होती.

त्यांनतर आता अजित पवारांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी चौधरी यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते शाईफेक करण्याच्या तयारीतही आले होते. या पार्श्वभूमीवर चौधरी यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

“मी जनभावना व्यक्त केली म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऑफिसमध्ये राष्ट्रवादीचे गुंड येऊन घोषणाबाजी करीत आहेत. माझ्या जीवितास धोका निर्माण झाला असून देवेंद्रजी मला संरक्षण द्यावी ही विनंती” अशी पोस्ट एक्सवर सुदर्शन चौधरी यांनी लिहिली आहे.

भाजपची शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला आमदार राहुल कुल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्यासमोरच चौधरी यांनी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे.

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणीत्यांनी केली. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको असं भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. अजित पवारांनी सुभाष बाप्पू, योगेश दादा या तिघांवर अन्याय केला. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेकांना महामंडळ मिळाले असते. अजितदादा असतील तर ही सत्ता आणि ही खुर्ची नको. अजितदादांसाठी सत्ता आणायची का? असा सवालही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता.

ज्या राष्ट्रवादीचा आम्ही दहा वर्षापासून विरोध करतोय तीच राष्ट्रवादी आता सोबत घेतली आहे. त्याच राष्ट्रवादीच्या अजित दादांना एकत्र बसवलं आहे. विधानसभेला अजितदादा सोबत असतील आणि सत्ता मिळणार असेल तर ती सत्ता आपल्याला नकोय असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.