Pune CP Amitesh Kumar | व्यसनमुक्ती चळवळीसाठी आता पुणे पोलिसांचा पुढाकार! पुणे शहराचा लौकिक कायम राखणार – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

0

पुणे : Pune CP Amitesh Kumar | पुणे शहराचा लौकिक आणि प्रतिष्ठा कायम राहावी,शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी ही ओळख आणखी समृद्ध करण्यासाठी पुणे पोलीस कायम प्रयत्नशील राहतील. आपल्या सुसंस्कृत शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना हद्दपार करण्यासाठी पुणे पोलीस सक्षम असल्याचे प्रतिपादन पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत निर्भय विद्यार्थी अभियान यांच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त येरवडा येथील गेनबा मोझे प्रशालेत आयोजित व्यसनमुक्ती सप्ताह च्या उद्घाटन प्रसंगी पोलीस आयुक्त बोलत होते. या कार्यक्रमाला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉ. मुक्ता पुणतांबेकर, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, मोजे प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्यासह निर्भय विद्यार्थी अभियानाचे सदस्य, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ” जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी केवळ व्यसनमुक्तीची शपथ घेऊन चालणार नाही. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेऊन व्यसनमुक्तीसाठी प्रत्यक्ष काम केले पाहिजे. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनामुळे गुन्हेगारी वाढत आहे. त्यामध्ये अल्पवयीन बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही मोठी सामाजिक समस्या रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईसह सामाजिक संस्थांच्या मदतीने आगामी काळातआम्ही ठोस उपाययोजना करणार आहोत. शाळा महाविद्यालयांसोबतच वस्ती पातळीवर व्यसनमुक्तीसाठी अभियान राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना डॉ.मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या,”मागील काही काळापासून अल्पवयीन तुला जर मुलांमध्ये दारू आणि ड्रग्ज या गंभीर व्यसनांचे प्रमाण वाढलेले आहे. एन्जॉयच्या तसेच मानसिक ताण घालविण्यासाठी तरुणांकडून व्यसन केली जातात. याच व्यसनांमुळे भविष्यात आरोग्याचे इतर त्रास व मानसिक आजार होतात. कोणाच्याही सांगण्यावरून मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये”असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

माजी आमदार व मोझे प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे यांनी देखील पुणे पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. मोझे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियानासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. निर्भय अभियानचे संस्थापक सदस्य दिलीप कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविकात अभियानाची भूमिका मांडली.मोझे शिक्षण संस्थेच्या डॉ.अलका पाटील यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. व्यसनमुक्ती सप्ताहाच्या माध्यमातून पुणे पोलिसांच्या वतीने शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने व्यसन विरोधी विचार या विषयावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे. यावेळी ग्रीन तारा फाउंडेशनच्या विद्यार्थिनींनी व्यसनमुक्ती वर पथनाट्य सादर केले. सूत्रसंचालन विवेक देव यांनी केले आभार निखिल गायकवाड यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.