Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी: सॅकमधून पिस्टल घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक, गुन्हे शाखेकडून 2 पिस्टल व 4 काडतुसे जप्त

0

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट -2 च्या पथकाने एकाला अटक केले असून त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख 2 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.25) चिंचवड गावात करण्यात आली.

दुर्गेश बापु शिंदे (वय-37 रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार जयवंत जगन्नाथ राऊत यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहीद अशोक कामटे बस स्टॉप जवळील चिंचवड देवस्थानच्या मोकळ्या जागेत एक जण थांबला आहे. त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या सॅकमध्ये पिस्टल असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये दोन पिस्टल व चार काडतुसे आढळून आली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक माने करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.