Mahavikas Aghadi | उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा घोषित करा; राऊतांच्या मागणीवर काँग्रेस – राष्ट्रवादीची सावध भूमिका

0

मुंबई : Mahavikas Aghadi | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाचा चेहरा न देता निवडणूक लढायची अशीच काही भूमिका महाविकास आघाडीने घेतली होती. मात्र आता निवडणुकीला सामोरे जाताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मविआ कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनच मतदान झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी आणि बिनचेहऱ्याचे सरकार अजिबात चालणार नाही असे राऊतांनी म्हंटले आहे. मात्र याबाबत काँग्रेस (Maharashtra Congress) आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) सावध भूमिका घेतली आहे. तर आम्ही आज एकत्रित आहोत, एकत्र राहणार आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री कोण यावर आम्ही चर्चा करत नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत असं सांगत उद्धव ठाकरेंच्या सीएम पदाच्या चेहऱ्यावर भाष्य करणं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी टाळलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कोण व्हावा याच्यात मविआच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आले पाहिजे हे स्वारस्य ठेवले पाहिजे. मविआत निवडून आलेले आमदार कोण मुख्यमंत्री हे ठरवतील. महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षातील नेत्याने मुख्यमंत्री कोण होणार अशी भाषा करणे टाळले पाहिजे असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत कधी काही बोलतील सांगता येत नाही. मागे निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केल्याचं आठवत असेल. आजच्या घडीला काँग्रेस दुसऱ्या चेहऱ्याला पुढे येऊ देणार नाही हे निश्चित आहे. उद्धव ठाकरेंचं नाव पुढे यावं ही राऊतांची मागणी त्यांच्या पक्षापुरती मर्यादित आहे. परंतु आघाडीत शरद पवार आणि इतर काँग्रेस नेते हे मान्य करतील असं वाटत नाही. म्हणून आघाडीत काडी लावण्याचा प्रकार संजय राऊतांनी (Sanjay Raut) सुरू केला आहे असा टोला शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राऊतांना लगावला आहे.

तसेच जर उद्धव ठाकरेंकडे पाहून लोकांनी मतदान केले असा दावा संजय राऊतांचा असेल तर काँग्रेस १ वरून १३ वर जाते आणि तुम्ही १८ वरून ९ वर कसे येता? हा प्रश्न उपस्थित होतो. तुमचा स्ट्राईक रेट आणि संख्याबळ हे कुठेही वाढताना दिसत नाही. त्यामुळे आघाडीत पाहिले तर सर्वात पुढे काँग्रेस, २ नंबरवर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान झालं हे म्हणणं गैर आहे असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.