Chandrakant Patil On Pubs In Pune | रात्री 11 ला झोपणे शरीरशास्त्राच्या नियम, सगळ्या पुणेकरांनी ठरवा अन् पब-बिअर बार 3 किंवा 7 दिवस बंद ठेवा; चंद्रकांत पाटलांचा महत्त्वाचा प्रस्ताव (Videos)

0

पुणे : Chandrakant Patil On Pubs In Pune | पुणे शहरात ड्रग्स बाबतच्या प्रकरणात वाढ होत आहे. मागेच ललित पाटील प्रकरण आणि त्यानंतरही कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स पुणे पोलिसांनी हस्तगत केले होते. कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताने शहरातील पब, बार चा मुद्दा चर्चेत आला. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महापालिका यांच्या कारवाईला आणि कार्यपद्धतीला घेऊन पुणेकरांनी प्रश्न उपस्थित केले.

त्यानंतर या विभागांकडून अनधिकृत पब, बार वर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र काही कालावधीनंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती दिसून आली. मागील दोन दिवसांपूर्वी एफसी रोडवरील हॉटेलमधल्या वॉशरूमध्ये ड्रग्स सेवन केले जात असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि त्यानंतर पुन्हा कारवाईला सुरुवात झाली.

या घटनांबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. या प्रकरणाबाबत मंत्री चंद्रकांत पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुण्यातील पब आणि बार संस्कृतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. सगळ्या पुण्याने मिळून तीन किंवा सात दिवस पब आणि बियर बार बंद करू असे ठरवले पाहिजे,असे चंद्रकांत पाटलांनी म्हंटले आहे.

ते म्हणाले, ” बार आणि पबमुळे निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी सगळ्या पुणेकरांनी एका व्यासपीठावर एकत्र येऊन नियमावली तयार केली पाहिजे. अरे तुम्ही पब आणि बार किती वाजेपर्यंत चालू ठेवणार? शरीरशास्त्राचा नियम आहे की, रात्री ११ ला झोपले पाहिजे. मग यांच्याबाबत तुम्ही रात्रभर दारु पिण्याची आणि अमली पदार्थ सेवन करण्याची परवानगी दिली काय? पब आणि बार चालू असताना नियमांची अंमलबजावणी करण्यात मर्यादा येतात.

त्यामुळे सात दिवस क्लिअर ड्राय, त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन नियमावली तयार करु, त्याच्या अंमलबजावणीचा प्रयत्न सर्वांनी करु. आमचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग जो आहे, त्यामध्ये अत्यंत गांभीर्याने या सगळ्याकडे पाहिले जात आहे. प्रत्येक महाविद्यालयात एक अतिरिक्त जागा निर्माण करता येईल का, याचा विचार आम्ही करत आहोत. जेणेकरुन या पदावरील व्यक्तीकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाईल.

व्यसनाकडे वळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला कोणाशी तरी बोलायचे असते. एकदा व्यक्ती व्यसनाधीन झाला की फायदा नसतो. त्यामुळे महाविद्यालयात समुपदेशकाची नवी पोस्ट निर्माण करण्याचा विचार आम्ही करत आहोत. त्यादृष्टीने येत्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करु “, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.