PM Narendra Modi | लोकसभेचे अधिवेशन सुरु, पंतप्रधान मोदींनी टोचले विरोधकांचे कान, म्हणाले ,”नागरिकांना विरोधकांचा ड्रामा नाही तर…”

0

दिल्ली : PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए ने केंद्रात सरकार स्थापन केले आहे. आजपासून लोकसभा अधिवेशन २०२४ ला सुरुवात झाली आहे. आज सकाळी लोकसभेचे तालिका सभापती म्हणून भर्तृहरी महताब यांची निवड करण्यात आली.

तालिका सभापती भर्तृहरी महताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे चांगलेच कान टोचले. “नागरिकांना विरोधकांचा ड्रामा नाही, तर चांगल्या कामाची अपेक्षा आहे,”असा हल्लाबोलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

मोदी म्हणाले, “देशाच्या जनतेनं आम्हाला तिसऱ्या वेळी सत्ता दिली आहे. हा खूप मोठा विजय आहे. जनतेनं आम्हाला दिलेली तिसऱ्या वेळेच्या संधीबद्दल देशातील नागरिकांचे आभार, आम्ही पहिल्यापेक्षा तीन पटीने अधिक काम करू. देशातील नागरिक विरोधकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतात. त्याच्यानुसार ते कार्य करतील.

ड्रामा, नाटकं होत राहतील, नागरिक अशी अपेक्षा करत नाहीत. नागरिकांना चांगल्या जबाबदार विरोधकांची गरज आहे. विरोधक चांगलं काम करुन नागरिकांच्या इच्छा पूर्ण करतील,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

आजपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं आहे. मात्र लोकसभेच्या अधिवेशनात ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी संविधानाची प्रत घेऊन मोठी घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान हे अधिवेशन अनेक मुद्यांवरून गाजणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये नीट परीक्षा घोटाळा, शेअर मार्केट घोटाळा यासह अन्य विषयांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.