Swargate To Mantralaya Shivneri Bus | पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! स्वारगेटवरून आता थेट मंत्रालयासाठी शिवनेरी सुरु

0

पुणे : Swargate To Mantralaya Shivneri Bus | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. ही शिवनेरी बस दर सोमवारी सकाळी ६ वाजता स्वारगेटवरून सुटेल आणि मंत्रालयातून दर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही सेवा आठवड्यातून दोन दिवस आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या आणि साप्ताहिक सुट्ट्यांदरम्यान पुण्यात येणाऱ्या नोकरदारांना ती सोयीची ठरणार आहे.

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. याचबरोबर अनेक नोकरदार नोकरीनिमित्त मुंबईत राहतात आणि आठवड्याच्या अखेरीस साप्ताहिक सुट्टीला पुण्यात परततात. ते पुन्हा सोमवारी सकाळी मुंबईला कामावर जातात. अशा प्रवाशांसाठी एसटीने स्वारगेट ते मंत्रालय शिवेनरी बस सुरू केली आहे.

या शिवनेरीचा प्रवास अटल सेतू मार्गे होणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूमुळे प्रवासाचे अंतर कमी झाले आहे. या मार्गावरून एसटी बस धावू लागल्या आहेत. पुणे ते दादर या अटल सेतूमार्गे जाणाऱ्या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी स्वारगेट ते मंत्रालय बसची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार ही सेवा सुरु करण्यात आली आहे. याचबरोबर सध्या या मार्गावर दररोज हिरकणी बसही सुरू आहे.पुण्यातून थेट मंत्रालयासाठी बसची मागणी नोकरदारांकडून करण्यात आली होती.

आता शिवनेरी सुरू झाल्याने मंत्रालयासह त्या परिसरात नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या बसच्या तिकिटात महिला, ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत आहे. ही सेवा ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आहे. या सेवेच्या तिकीटाची नोंदणी एसटीचे संकेतस्थळ आणि मोबाईल उपयोजनावर प्रवासी करू शकतात अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.