Sharad Pawar In Baramati | लोकसभेला साथ दिली तशीच विधानसभेला द्या; शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन

0

बारामती: Sharad Pawar In Baramati | बारामती लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) रिंगणात होत्या. ही निवडणूक सर्वात अटीतटीची आणि प्रतिष्ठेची ठरली. या निवडणुकीदरम्यान लोकं शरद पवार की अजित पवार यांच्याबरोबर उभे राहणार हा महत्वाचा प्रश्न होता.

मात्र सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडून आल्याने येथील जनता शरद पवारांच्या पाठीशी उभी राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी शरद पवारांची फारकत घेत महायुतीत (Mahayuti) सहभागी होत आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे पवार विरुद्ध पवार हा संघर्ष उभा राहिला आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात अनेक आव्हानांना झेलत लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना विजयी केल्या नंतर आता विधानसभेच्या निवडणुकीला शरद पवारांनी लक्ष करत मोर्चे बांधणीची जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.

आपल्याला आता बदल घडवायचा आहे, तरुणांनी ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीत साथ दिली तशीच यापुढे देखील आम्हाला विधानसभेला साथ द्या असे आवाहन करत कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. पवार (सांगवी) बारामती याठिकाणी बोलत होते.

सध्या शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात यंदाच्या विधानसभेला कोण टक्कर देणार याची उत्सुकता बारामतीकरांना लागली आहे. यामुळे विधानसभेची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. विधानसभेला नक्कीच शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांपुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.