Ghole Road Pune Crime News | पुणे: वसतिगहाची लिफ्ट बंद पडल्याने उडी मारली, महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; घोले रोडवरील घटना

0

पुणे : – Ghole Road Pune Crime News | वसतिगृहाची लिफ्ट बंद पडल्याने महाविद्यालयीन तरुणाने लिफ्टमधून बाहेर उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेला जबाबदार ठरल्याप्रकरणी शिवाजीनगर भागातील वसतिगृहाच्या विश्वस्तांसह रखवालदार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय अशोक मिरांडे (वय 19, सध्या रा. जे. पी. त्रिवेदी मेमोरियल ट्रस्ट, घोले रोड, शिवाजीनगर पुणे मूळ रा. वैष्णवी बंगला, धनाजीनगर, सावेडी, अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जे. पी. त्रिवेदी मेमोरिअल ट्रस्टचे विश्वस्त (J.P. Trivedi Memorial Trust), वसतिगृहाचे पर्यवेक्षक अंजना केतन मोतीवाला (Anjana Ketan Motiwala), रखवालदार सुभाष सुर्वे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवध (आयपीसी 304 अ), तसेच ३४ या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजयचे वडील अशोक मदनलाल मिरांडे (वय 55) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. अजय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अजय हा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे शिवाजीनगर या कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो शिवाजीनगर परिसरातील घोले रस्त्यावर जे.पी. त्रिवेदी मेमोरियल ट्रस्टचे वसतिगृहात चौथ्या मजल्यावर राहत होता. 15 मार्च रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास अजय आणि त्याचे मित्र लिफ्टमधून निघाले होते. त्यावेळी लिफ्ट बंद पडली. रखवालदार सुर्वे याने लिफ्ट बंद पडल्यानंतर मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले नाही. अजयला लिफ्टच्या डक्टमध्ये उडी मारण्यास सांगितले. अजयने उडी मारल्याने तो लिफ्टच्या डक्टमध्ये पडल्याने त्याच्या डोक्याला, हाता-पायांना गंभीर मार लागून जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लिफ्टमधील मुलांना बाहेर काढण्यासाठी पर्यवेक्षक मोतीवाला यांनी योग्य त्या सूचना दिल्या नव्हत्या. त्यांना याबाबतचे मार्गदर्शन वसतिगृहातील रखवालदारला दिले नसल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर मोतीवाला यांच्यासह रखवालदार सुर्वे, तसेच विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.