Murlidhar Mohol | राज्यातील सहकार क्षेत्रावर पकड मिळविण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ‘सहकार’ मंत्रालयाची जबाबदारी !

0

पुणे: Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकार क्षेत्राचे योगदान मोठे असून आतापर्यंत कॉंग्रेस व मित्र पक्षाने सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच राजकारणावर पकड बसविली आहे. याला छेद देण्यासाठी मोहोळ यांच्यावर भाजपने सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी सोपविली आहे. तर नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माध्यमातून औद्योगीक नगरीच्या नवीन विस्तारीत विमानतळाचा प्रश्‍न देखिल गतीने मार्गी लागेल, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

मुरलीधर मोहोळ यांचा लोकसभा निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने विजय झाला. लोकसभेतील पहिल्या विजयानंतर पक्षनेतृत्वाने त्यांना राज्यमंत्रीपद देत विश्‍वास व्यक्त केला. तर आज त्यांना अवघ्या काही वर्षांपुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाचे राज्यमंत्री पद तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देखिल सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्राला सहकार क्षेत्राची मोठी परंपरा आहे. प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रामध्ये साखर, दूग्ध उद्योग, कापूस, शेतीमाल उत्पादन विक्रीसह याला पूरक बँकींग क्षेत्रातही सहकाराची प्रमुख भूमिका राहीली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अद्यापही मोठ्याप्रमाणावर सहकार क्षेत्रावर आधारीत आहे. सहकार क्षेत्रावर ज्याची पकड त्याची राज्यातील राजकारणावर पकड असे आतापर्यंतचे सूत्र राहीले आहे. राज्यातील सहकार क्षेत्रावर प्रामुख्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच वरचष्मा राहीला आहे. सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसारखे राज्य अख्त्यारीत राहावे यासाठी मागील टर्ममध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. योगायोगाने नव्या मंत्री मंडळातही अमित शहा यांच्याकडेच या मंत्रालयाची धुरा असून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा पदभार देउन मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा राजकिय वर्तुळामध्ये उमटू लागली आहे.

पुण्यासारख्या औद्योगीक नगरीत हवाईदलाचे विमानतळ असल्याने त्यावर काही मर्यादा आहेत. या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दृष्टीने पुणे शहराच्या नजीक आणि तुलनेने सधन अशा पश्‍चिम महाराष्ट्रासाठी पुरंदर येथे विमानतळ उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे. परंतू मागील तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरी उड्डाण मंत्रालयाचा पदभार मोहोळ यांच्याकडे सोपविल्याने पाठपुरावा करून विमानतळाचा प्रश्‍नही नजीकच्या काळात मार्गी लागेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.