Eknath Shinde – Uddhav Thackeray | शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्त्यव्य; “…तर भविष्यात”

0

मुंबई: Eknath Shinde – Uddhav Thackeray | देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन झाले आहे. दिल्लीत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाला एकच राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराजी आहे. दरम्यान आता दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या बाहेर लागलेल्या बॅनरची चांगलीच चर्चा आहे. “शिवसैनिकांनो वाघांनो संघटित व्हा. महाराष्ट्राच्या विकासाला गतिशील करा. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा” अशा आशयाच्या बॅनरने लक्ष वेधून घेतले आहे.

शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येण्याबाबत संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले , “दोन्ही गटाच्या दिशा वेगवेगळ्या ठरलेल्या आहेत. एक गट एका दिशेला तर दुसरा गट दुसऱ्या दिशेला आहे. मात्र, त्या दिशा बदलून एका दिशेला आले तर निश्चितच स्वागत केलं जाईल. पण त्या विचारसरणीमध्ये आणि या विचारसरणीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.

एकेकाळी शिवसेना प्रमुख हे आमचे दैवत आहेत, असं सर्वजण म्हणायचे. मात्र, आता काही लोक शरद पवार आणि राहुल गांधी यांना आमचं दैवत म्हणायला लागले आहेत, त्यामुळे आम्हाला त्रास होतो. पण त्यांनी (उद्धव ठाकरे यांनी) त्यांची स्टॅटर्जी बदलली तर भविष्यात एकत्र यायला हरकत नाही”, असं मोठं विधान शिवेसना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे.

तसेच याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ” शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो. शिवसैनिकांसाठी मातोश्री आणि शिवसेनेचे दरवाजे कायम खुले असणार आहेत.

मात्र, ज्यांनी पक्षफोडीचं एक मोठं कट कारस्थान रचलं आणि हे कारस्थान रचताना शिवसेनेला पर्यायाने महाराष्ट्राला एका खाईत लोटण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, अशा कपटी आणि कारस्थांनी लोकांना बरोबर घ्यायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.