Pune PMC News | खाजगी हॉस्पिटलचे अवाजवी बिल; तक्रारीनंतर महापालिकेकडून तात्पुरती मलमपट्टी

0

पुणे: Pune PMC News | पुणे शहरात खाजगी हॉस्पिटलचे (Private Hospital Pune) अवाजवी बिल, रुग्ण हक्कांची होत असलेली पायमल्ली उपचारांची दरपत्रके आदी नियमबाह्य गोष्टींना घेऊन अनेकदा आंदोलने करण्यात आलेली आहेत. मात्र महापालिकेकडून (Pune Municipal Corporation-PMC) यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शुश्रूषागृहे नोंदणी नियम २०२१ शासन अधिसूचना १४ जानेवारी २०२१ रोजी राज्यातील हॉस्पिटल्सना लागू केली आहे. या अधिसूचनेमध्ये सुधारित नियमांचा अंतर्भाव केला आहे. यानुसार तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे बंधनकारक केलेले आहे. त्यानुसार महापालिकेने आरोग्य कार्यकर्त्यांच्या रेट्यानंतर तात्पुरता का होईना हा तक्रार निवारण कक्ष सुरू केला. त्यावर आलेल्या तक्रारीही लिहून घ्यायला सुरुवात केली होती. मात्र, नंतर त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

खासगी रुग्णालयांच्या चुकीच्या कृत्यांबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. त्याचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४१५१ हा असा असून तो कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ पर्यंत कार्यान्वित राहील असे सांगण्यात आले होते.

मात्र तक्रार करण्यासाठी असलेल्या महापालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर मागच्या पाच महिन्यांपासून कोणताही प्रतिसाद नाही. त्यामुळे रुग्णांच्या अडचणी वाढल्या असून हॉस्पिटलचे चांगलेच फावल्याचे चित्र आहे. या टोल फ्री नंबरवर फोन लागतो, त्यावर रिंगही दोन ते तीन सेकंद वाजते. परंतु त्यावर कोणीच प्रतिसाद देत नाही. नंतर ‘सॉरी देअर इज नो रिप्लाय फ्रॉम दिस नंबर’ असा रेकॉर्डेड मेसेज ऐकायला येतो.

हा नंबर सुरू नसल्याने खासगी रुग्णालयांची तक्रार कशी आणि कोणाकडे करायची, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सुरुवातीला हा क्रमांक सहा महिन्यापर्यंत सुरू होता. नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परंतु, यामध्ये सर्वसामान्य रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून मुस्कटदाबी होत आहे. त्यांचे आरोग्य खात्याला काहीही सोयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.