Supriya Sule-Sunetra Pawar | बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विजयी, सुनेत्रा पवार यांचा पराभव

0

बारामती: Supriya Sule-Sunetra Pawar | गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election Results 2024) रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इंडिया आघाडी (India Aghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांचा पहिला सामना झाला तो त्यांच्या होमग्राऊंडवर, बारामतीमध्ये. अजित पवारांनी शरद पवारांशी थेट पंगा घेत, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचीच उमेदवारी जाहीर केली. अजित पवारांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांनीही विरोध करत सुप्रिया सुळेंचा प्रचार केला.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजितदादांना दिल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्षसंघटना उभी केली. तुतारी या चिन्हासह ते लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेले.

राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी पक्षाच्या बारामतीत असलेल्या अस्तित्वाच्या लढाईत अखेर सुप्रिया सुळेंनी बाजी मारली.अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

बारामतीमध्ये पवारांना घेरण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. जे जे नेते अजित पवारांच्या विरोधात होते, त्या नेत्यांना भाजपने आपल्याकडे वळवून घेतले आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय केले . हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी निकालांवर भाष्य केले.

त्यावेळी त्यांना बारामतीच्या निकालावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले , “बारामतीमध्ये काही वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. विशेषत: इथला बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे, त्याच्याशी माझं ६० वर्षांचं नातं आहे. माझी सुरुवातच तिथून झाली होती. प्रचार करो न करो, तिथला सामान्य माणूस जो आहे, त्याची मानसिकता मला माहीत आहे. मी तिथं गेलो असू किंवा नसू, तिथले लोक योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची मला खात्री होती” , असं शरद पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.