Nitish Kumar | नितीश कुमारांना थेट उपपंतप्रधानपदाची ऑफर?; राजकीय हालचालींना वेग

0

मुंबई: Nitish Kumar | लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपाने ४०० पार चा नारा दिलेला होता मात्र आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशातील राजकीय घडामोडी बदलत असल्याचे चित्र आहे.

देशात महत्त्वाची राज्य असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र राज्यात भाजप आघाडीच्या जागा घेतल्या आहे. त्यामुळे, नितीश कुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यातच नितीश कुमार यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना भेट नाकारल्याने त्यांच्या भूमिकेवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतील बडे नेते नितीश कुमार यांच्या संपर्कात असून नितीश कुमार यांना थेट उप पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे, पुढील काही दिवसांत बिहारसह देशातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे पुढची रणनीती ठरवण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे भाजप सरचिटणीस विनोद तावडेंच्या भेटीला गेले आहेत.

तर, भाजपने संख्याबळासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांना फोन केल्याची माहिती आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी नितीश कुमारांनी भाजपसोबत जाऊन आघाडी केली. त्यानंतर, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. मात्र, आता इंडिया आघाडीकडील निकालाचे कल पाहाता नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडीसोबत येतात की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच, नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री चौधरी यांनाच भेट नाकारल्याने ह्या चर्चांना अधिकची बळकटी मिळाली आहे.

सत्तास्थापनेसाठीची मॅजिक फिगर २७२ इतकी आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता एनडीए आघाडी बहुमताचा आकडा जेमतेम गाठेल, असे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.