Pune News | मित्राच्या लग्नाला आले आणि स्वतःच विवाह बंधनात अडकले ! जर्मनीच्या जोडप्याचा हिंदू पद्धतीने विवाह सोहळा

0

पुणे: Pune News | सेनापती बापट रस्त्यावरील रोहन गरिमा सोसायटीतील रहिवासी, संजय शिंदे यांचा मोठा मुलगा श्रवण हा जर्मनीत एका खाजगी कंपनीत सात वर्षापासून नोकरीस आहे. श्रवण व श्रध्दा यांचे लग्न निशीगंधा जल महल, पिंपळोली (ता. मुळशी) या ठिकाणी २१ एप्रिल रोजी झाले. श्रवण जर्मनीत राहत असल्याने जर्मनीतील त्याचे मित्र, मैत्रीणी लग्नापूर्वीच तीन चार दिवस पुण्यात आले होते.

जर्मनीतून पुण्यात मित्राच्या लग्नाला आल्यानंतर लग्नातील हिंदू धार्मिक परंपरा, लग्नामध्ये पै-पाहुण्यांचा उत्साहाने असलेला सहभाग, हळद लावणे या गोष्टी भावल्याने त्यांनाही हिंदू पध्दतीने लग्न करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही हिंदू परंपरेप्रमाणे विवाह करण्याचा निर्णय घेतला.

जर्मनीच्या म्युनिच शहरात वास्तव्यास असलेले मुलगा लुकास स्टांग व मुलगी टेरेसा कोर्स हे दोघेजन मित्र श्रवण शिंदे व श्रध्दा पाटील यांच्या लग्नसाठी पुण्यात आले होते. शिंदे यांचे लग्न हिंदू धर्म पध्दतीने करण्यात येत होते. या लुकास व टेरेसा यांनी लगेच लग्न करण्याचा निर्णन घेतला आणि हिंदू परंपरेप्रमाणे भटजी अशोक यांच्या साक्षीने विवाहसोहळा संपन्न झाला.

लग्नातील प्रत्येक कार्यात सर्वांचा सहभाग होता. मेंहदी काढणे, बांगड्या भरणे, साडी नेसणे, फेटा बांधणे, कपड्यांची खरेदी करणे अशा सर्व कार्यात विदेशी पाहुणे उत्साहाने सहभागी होते, धार्मिक विधीचे महत्व जाणून घेत होते. या पाहुण्यामध्ये मुलगा लुकास स्टांग व त्याची मैत्रीण टेरेसा कोर्स हे देखील सहभागी होते. लुकास हा जर्मनीत सरकारी नोकरी करतो तर टेरेसा ही एका महामंडळात नोकरी करते.

पुण्यात लग्नासाठी आल्यानंतर शनिवारवाडा, पेठ परिसर, सारसबाग आदी भागत ते फिरले, लक्ष्मी रस्त्यावरून भारतीय पारंपरिक वस्र, हातगाडीवरून कानातले, बांगड्या इतर साहित्य त्यानी खरेदी केले. पुण्यातील रिक्षाचा प्रवास, शनिवारवाडा त्यांना खूप आवडल्याचे सांगितले. लग्नाच्या दिवसी लुकास याने सकाळी बांधलेला फेटा रात्रीच उतरवला.

लग्नमंडप, विधी, भटजी, होम, रांगोळी, फुलांच्या माळांनी सजवलेला परिसर पाहून लुकास व टेरेसा यांना लग्न करण्याचा मोह आवरता आला नाही. त्या दोघांनी श्रवण आणि श्रध्दाच्या लग्नकार्यात हिंदू धर्म पध्दतीने आपलेही लग्न पार पाडले. या विवाहाची आता सगळीकडे चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.