Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : मुलगी 15 फूट हवेत उडाली, आरोपी नशेत; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम

0

पुणे : – Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर (Kalyani Nagar Accident) परिसरात पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. ज्या रात्री अपघात झाला त्यावेळी नेमकं काय घडलं त्याचा घटनाक्रम संकेत नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितला आहे. बिल्डरच्या मुलाने जेव्हा दुचाकीस्वाराला उडविले तेव्हा मागे बसलेली मुलगी 15 फूट उंच उडाल्याचे आपण पाहिल्याचे संकेत यांनी सांगितले. अपघाताच्या रात्री पोर्शे कार अल्पवयीन आरोपीच चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. संकेत यांनीच आरोपी मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्रत्यक्षदर्शी संकेत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी पोर्शे कारचा वेग अतिशय जास्त होता. कारनं दुचाकीला दिलेली धडक एवढी जोरात होती की आम्हाला काही कळलंच नाही. दुचाकीवरील मुलीचा जागीच मृत्यू झाला. ती माझ्यासमोर 15 फूट उंच उडाली. अपघात एवढा भयानक होता की त्या दुचाकीवरील तरुणाच्या शरीराचे बेकार हाल झाले होते, अशी माहिती संकेत यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

अपघात झाला त्यावेळी पोर्शे कारमध्ये बिल्डरच्या मुलासह आणखी दोन ते तीन लोक होते. अपघातानंतर बिल्डरचा मुलगा पळून जाऊ शकला नाही कारण त्याच्या कारच्या सर्व एअर बॅग उघडल्या होत्या. त्यामुळेच हे लोक कारच्या बाहेर आले होते, असे संकेत यांनी सांगितले. अपघातानंतर गर्दी जमू लागली. या गर्दीतील लोकांनी आरोपीला पकडून मारहाण केली. जेव्हा पोलीस आले तेव्हा त्यांच्याकडे या आरोपील मी सोपवल्याचे संकेत यांनी सांगितले.

पोर्शे कार हा बिल्डरचा मुलगाच चालवत होता. तो पूर्णपणे नशेत होता. त्याला लोक एवढे मारत होते तरी त्याला काही कळत नव्हते. त्याला काही फरक पडत नव्हता. मी त्याला गाडीकडे घेऊन गेलो आणि त्याला दाखवले की हे बघ तू काय केले आहे, असा गौप्यस्फोट संकेत यांनी केला.

जेव्हा गर्दी त्याला मारत होती तेव्हा कोणालाच तो कोण आहे हे माहित नव्हते. पण तितक्यात गर्दीतून कोणीतरी ओरडलं, अरे हा तर अगरवालचा मुलगा आहे. बिल्डरचा मुलगा आहे. तेव्हा त्या आरोपीची ओळख पटली, असा घटनाक्रम संकेतनं सांगितला.

Leave A Reply

Your email address will not be published.