Parihar Chowk Aundh Pune | परिहरा चौकातील शिवदत्त मित्र मिनी मार्केटचे बेकायदा पुनर्वसन करू नये; स्थानीक माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

0

पुणे : Parihar Chowk Aundh Pune | औंध येथील वर्दळीच्या परिहार चौकात महापालिकेने ११ वर्षांच्या लीजवर दिलेल्या जागेवरील शिवदत्त मित्र मिनी मार्केटचा (Shivdatta Mitra Mini Market) करार संपून अनेक वर्षे उलटली. नो हॉकर्स झोन रस्त्यावर असलेले हे मिनी मार्केट हलविण्याबाबत आठ वर्षांपुर्वी अहवाल देणार्‍या अतिक्रमण विभागाने या मार्केटचे याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. विशेष असे की, याठिकाणी रस्ता रुंदीकरण प्रस्तावित असतानाही हा प्रस्ताव मान्य केल्याने वाहतुक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे महापालिकेने बेकायदेशीर पुर्नवसनाचा घाट घालू नये अशी मागणी माजी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे, प्रकाश ढोरे यांच्यासह शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केली आहे.

माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांनी आज महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देउन सर्व कागदपत्र सादर केली आहेत. मुसळे यांनी सांगितले, की महापालिकेने औंध येथील अत्यंत वर्दळीच्या परिहार चौकालगतची जागा ११ वर्षांच्या लीजवर शिवदत्त मित्र मिनी मार्केटसाठी दिली होती. याठिकाणी साधारण ३० स्टॉल्स होते. हा करार २०१३ मध्ये संपुष्टात आल्यानंतरही संबधितांनी ताबा सोडला नव्हता. यामुळे तत्कालीन अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी नो हॉकर्स झोन असलेल्या या रस्त्यावरील मिनी मार्केटचे स्टॉल्स हटवून जागा ताब्यात घेण्यात यावे, असा अहवाल अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांना दिला होता. उगले यांनी त्या अहवालाला मान्यता देउन कार्यवाहीचे आदेश दिले होते.

परंतू या आदेशाविरोधात संबधित व्यावसायीक न्यायालयात गेले असून अद्याप हे प्रकरण न्यायालयात आहे. मात्र, मागील वर्षी अतिक्रम विभाग प्रमुख माधव जगताप यांनी या व्यावसायीकांचे त्याच जागेवर पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला तत्कालीन महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र, वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मागील आठवड्यात मालमत्ता विभागाचे प्रमुख महेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे स्टॉल्स हटविण्याचा निर्णय झाला आहे. मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप हे आर्थिक हितापोटी याच जागेवर संबधित व्यावसायीकांचे पुनर्वसन करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचा आरोप अर्चना मुसळे आणि ऍड. मधुकर मुसळे यांनी केला आहे. अतिक्रमण विभाग प्रमुखांनी व्यावसायीकांचे बेकायदेशीररित्या पुनर्वसन केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुसळे यांनी दिला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि स्थानीक पदाधिकारी नाना वाळके यांनी देखिल येथील स्टॉल्सचे बेकायदेशीर पुनर्वसन करण्यास विरोध दर्शविला असून प्रशासनाने निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शिवदत्त मित्र मिनी मार्केटचे पुनर्वसन हे रस्त्याच्या कडेला करण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. याठिकाणच्या पदपथाचे काम झाले असून पदपथामागील मोकळ्या जागेवर हे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

  • माधव जगताप, अतिक्रमण विभाग प्रमुख (Madhav Jagtap PMC)
Leave A Reply

Your email address will not be published.