Eknath Shinde Send Notice To Sanjay Raut | “तीन दिवसात माफी मागा अन्यथा…”; मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना नोटीस

0

मुंबई: Eknath Shinde Send Notice To Sanjay Raut | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये तीन दिवसात माफी मागा अथवा दिवाणी, फौजदारीसारख्या कारवाईला सामोरे जा असे म्हंटले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नोटिशीत विविध आरोप केले आहेत. २६ मे रोजीच्या सदरात एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटल्याचा बिनबुडाचा आणि धांदात खोटा आरोप केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांचे उमेदवार निवडून येऊ नयेत, यासाठीही खटाटोप केल्याचा आरोप सदरात होता. हा आरोपही बदनामीकारक आणि दिशाभूल करणारा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत एकही पैसा वितरित केलेला नाही. जर पैसे वाटल्याचा आरोप करायचा असेल तर त्यासंबंधीचे पुरावे सादर करा. फक्त मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशाप्रकारचा अपप्रचार केला जात आहे,” असा आरोप या नोटिशीतून करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील रोखठोकमधून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.

संजय राऊत यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी नोटीस पाठवल्याची माहिती एक्स या सोशल मीडिआ अकाऊंटवरुन दिली आहे. “५० खोके एकदम ओके. इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे. असंवैधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक अतिशय मनोरंजक आणि एक मजेदार राजकीय दस्तऐवज पाठवला आहे. आता मजा येईल!! जय महाराष्ट्र!,” असे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. या नोटीशीमध्ये मानहानीचा दावा देखील करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटल्याचा आरोप संजय राऊतांनी सामनामधून केला होता. पैसे वाटण्याच्या आरोपावरुन संजय राऊतांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.