SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात 750 ग्रॅम गांजा सापडल्याने खळबळ; विविध संघटनांकडून कारवाईची मागणी

0

पुणे: SPPU News | विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काही दिवसात ड्रग्स बाबतच्या अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे एकूणच सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच (Savitribai Phule Pune University – SPPU) गांजा (Ganja) सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याबाबत आता विविध संघटनांकडून कारवाईची मागणी पुढे येत आहे.

काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह (SPPU Boys Hostel) क्रमांक ८ मध्ये सुमारे ७५० ग्रॅम गांजा (Marijuana) सापडला होता. विद्यापीठ प्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करत असून कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात युवा सेनेने निवेदन प्रसिद्ध करून येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास ‘शिवसेना’ शैलीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ही घटना १४ मे रोजी उघडकीस आली. एवढा गंभीर प्रकार घडूनही पुणे विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

या घटनेला १० दिवस लोटल्यानंतरही काहीच ठोस कृती विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली नाही. केवळ या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात येईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

(उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे शहरप्रमुख राम थरकुडे म्हणाले, “कल्याणीनगर दुर्घटनेनंतर शहरातील पबवर कारवाई करण्यात आली. तरुणांना बळी पडू नये यासाठी पब संस्कृतीवर पुन्हा एकदा विविध संघटनांनी आवाज उठवला. व्यसनमुक्ती हे प्रकरण ताजे असतानाच आता विद्यापीठाच्या बॉईज हॉस्टेलमध्ये अमली पदार्थ आढळून आल्याने विद्यापीठाची प्रतिमा खराब होणे ही लज्जास्पद बाब आहे त्यामुळे या प्रकरणात विद्यापीठाची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.

अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना मदत करावी, तसेच विद्यापीठाच्या आवारात तसेच संलग्न महाविद्यालयांमध्येही दक्ष राहावे विद्यापीठात विद्यार्थी भरकटणार नाहीत याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे वय आणि शिक्षण लक्षात घेऊन विद्यापीठाने जनजागृती मोहीम राबवावी” असे थरकुडे यांनी सांगितले.

आता विद्यार्थी संघटनांच्या मागणीनंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.