Kalyan Lok Sabha | कल्याणमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्याला अमानुष मारहाण, कपडे फाटेपर्यंत मारले, व्हिडिओ व्हायरल

0

मुंबई : Kalyan Lok Sabha | कल्याण लोकसभा निवडणुकीचे मतदान २० मे रोजी होत आहे. तत्पूर्वी, कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अमानुष मारहाण केली आहे. इतकी मारहाण करण्यात आली की या पदाधिकाऱ्याचे कपडे फाटले. बचावासाठी तो क्षमा याचना करत होता. विशेष म्हणजे कोणतीही चूक नसताना गैरसमजातून ही मारहाण झाल्याचे आता समोर येत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करताना कार्यकर्ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील करत होते. मिलिंद कांबळे असे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. पीडित पदाधिकारी मी काहीही केले नाही, मला सोडा. मी मंत्रालयात कामाला असून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत काम केले आहे, असे हा पदाधिकारी सांगत होता.

कल्याण पश्चिमेकडील रोनक सिटीमध्ये वंचितचे पदाधिकारी मिलिंद कांबळे राहतात. त्यांना वंचितने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून (Bhiwandi Lok Sabha) उमेदवारी दिली. उमेदवारीसाठीचा पक्षाचा एबी फॉर्म कांबळे यांना देण्याची जबाबदारी एका व्यक्तीला देण्यात आली. ही जबाबदारी दिलेल्या व्यक्तीचे देखील नाव मिलिंद कांबळे होते. नावातील साम्याचा फायदा घेत मिलिंद कांबळे याने फॉर्म चोरून अर्ज दाखल केला. या प्रकरणी एबी फॉर्म चोरून फॉर्म भरणाऱ्या मिलिंद कांबळे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी भिवंडी पोलिसांचा (Bhiwandi Police) तपास सुरू आहे. मात्र वंचितच्या कार्यकर्त्यांनी काल कल्याण रोनक सिटीमध्ये राहणाऱ्या मिलिंद कांबळे यांना गाठत जाब विचारला. त्यावेळी मिलिंद कांबळे यांनी आपल्यासोबत कशी फसवणूक झाली ते सांगितले. मात्र, वंचितच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही देखील सहभागी आहात, असे म्हणत मारहाण केली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.