Pimpri Chinchwad Police | पिंपरी : पोलीस ठाणे स्तरावर प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिन

0

पिंपरी : – Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवडकरांना आपल्या समस्या मांडता येणार आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात महिन्यातील प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे तक्रारी स्वीकारल्या जातात. यामध्ये वेब पोर्टल, व्हॉट्सअॅप, ई-मेल तसेच प्रत्यक्षरीत्या पोलीस आयुक्त कार्य़ालय, पोलीस उपायुक्त कार्य़ालय, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय व पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज प्राप्त होत असतात. प्राप्त तक्रार अर्जांवर मुदतीत कार्यवाही करुन अर्जाची निर्गती होणे आवश्यक आहे. नागरिकांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची वेळेत कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असते.

नागरिकांशी थेट संपर्क साधता यावा व तक्रारदार यांची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांच्या तक्रारीचे वेळेत निरसन व्हावे यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात प्रत्येक महिन्याच्या दर शनिवार सकाळी 10.30 ते दुपारी 2.00 पर्यंत तक्रार दिनाचे आयोजन केले आहे. यावेळी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येणार आहे. तक्रार निवारण दिनाच्या दिवशी तक्रारदार यांनी आपआपल्या तक्रारी नुसार संबंधीत पोलीस ठाण्यात उपस्थित रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.