Shrikant Eknath Shinde | संविधान बदलले जाणार असल्याचे सांगून समाजाची दिशाभूल, डॉ. श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

0

डोंबिवली : – Shrikant Eknath Shinde | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणे कुणालाही शक्य नसून विरोधकांकडून संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ज्या काँग्रेसने संविधान बदलून देशात आणीबाणी लावली, तीच काँग्रेस आज संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवते, हे दुर्दैवी आणि दुटप्पीपणाचे असल्याची टीकाही शिंदे यांनी केली. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात श्रीकांत शिंदे बोलत होते. (Kalyan Lok Sabha constituency)

कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बुद्धीभूमी फाउंडेशनने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना डॉ. किरण शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. आज विरोधकांकडे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मुद्देच नसून त्यामुळे देशाचे संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे.

मात्र, याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांचा निवडणुकीत पराभव केला होता, हे आज विसरुन चालणार नाही, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संविधान दिन साजरा करणे सुरु केले, संविधान यात्रा सुरु केली, इतकेच नव्हे तर नवीन संसद भवनालाही संविधान भवन असे नाव दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कल्याणमध्ये बुद्धभूमी फाऊंडेशनकडून तथागत भगवान गौतम बुद्धांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू असून भविष्यात त्यांच्या काही प्रलंबित विषयांसाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.