Prithviraj Chavan On Prakash Ambedkar | लोकांना प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समजला, त्यांना एक टक्काही मतं मिळणार नाहीत : पृथ्वीराज चव्हाण

0

मुंबई : Prithviraj Chavan On Prakash Ambedkar | लोकांना प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समजला आहे. त्यामुळे यावेळी त्यांना एक टक्का मते मिळतील की नाही याबाबत शंका आहे. महाविकास आघाडीत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) पाच जागा देत होतो. त्यांनी त्या घ्यायला हव्या होत्या. मात्र त्यांनी त्या जागा घेतल्या नाहीत, असे विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ते एका वृत्तपत्राला मुलाखत देताना बोलत होते.

दरम्यान, चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. कारण वंचितने लोकसभेला सहा ते सात ठिकाणी मविआमधील काँग्रेससह अन्य पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील दलित समाज भाजपापासून दूर गेला आहे. भाजपाच्या ४०० जागा आल्या तर आपले संविधान बदलले जाईल हे दलित समुदायाच्या डोक्यात पक्क झाले आहे. संविधान धोक्यात आहे याची त्यांना जाणीव आहे. त्याचबरोबर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आमचे नुकसान केले खरे, मात्र आता तसे होणार नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला ७ टक्के मते मिळाली होती. मात्र त्यावेळी त्यांची असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमशी युती होती. त्या युतीत त्यांना ७ टक्के मते मिळाली होती. त्यापैकी तीन ते साडेतीन टक्के मते कदाचित वंचितची असतील. मात्र यावेळी वंचितला ती साडेतीन टक्के मतंही मिळणार नाहीत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत फार मोठा बदल जाणवतो. आताच्या घडीला माझे महाराष्ट्राचे जे आकलन आहे, त्यानुसार महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळतील. ही संख्या वाढू शकते. आम्ही या निवडणुकीत पाच मुद्द्यांवर भर दिला आहे.

त्यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकरी, दोन्ही प्रकारचा भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि सरकार पाडले वगैरे नैतिक भ्रष्टाचार, शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधान बचाव, या मुद्द्यांचा समावेश आहे. हे सगळे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आम्हाला दिले आहेत, असे चव्हाण यांनी म्हटले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदींनी फार चुका केल्या आहेत. त्यांच्या भाषणांचा स्तर घसरला आहे. त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. हे लोक ४०० पार जाणार असतील तर त्यांनी भाजपाच्या जाहिरनाम्यावर बोलावे. हे लोक काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर बोलतात. काँग्रेस तुमची संपत्ती काढून घेईल, अशा गप्पा ते मारतात. मोदींनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानीबाबत केलेली वक्तव्ये त्यांच्याच अंगलट आल्याचे चव्हाण म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.