Manoj Jarange Patil | मोठी बातमी! मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंना पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे म्हणाले…

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईकडे लाखोंच्या संख्येने निघालेले मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर पोहोचत असतानाच गृहखात्याने मोठा धक्का या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना दिला आहे. जरांगे २६ जानेवारीपासून मुंबईतील ज्या आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलन करणार होते, तिथे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना परवानगी नाकारली असून खारघर येथील मैदानाचा पर्याय दिला आहे. यावर जरांगे यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत हा पर्याय धुडकावला आहे.

मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येने असल्याने आणि त्यांची वाहने मुंबईत येणार असल्याने येथील दैनंदिन जनजीनव विस्कळीत होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांना आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असून नवी मुंबईमधील खारगर येथील सेंट्रल पार्कमधील आंतरराष्ट्रीय मैदानाचा पर्याय पोलिसांनी आयोजकांना सुचवला आहे.

आझाद मैदानात मराठा आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी रोखठोक भूमिका घेत पोलिसांचा पर्याय धुडकावला आहे. मनोज जरांगे यांनी म्हटले की, आझाद मैदानावर व्यासपीठ उभे राहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अद्याप संवाद होऊ शकलेला नाही. आम्हाला तोडगा काढायचा आहे. मज्जा करण्यासाठी मुंबईला आलो नाही. जेवढे मुंबईचे हाल होतील, तेवढे आमचेही हाल होत आहेत. दोघांचेही हाल होऊ द्यायचे नाही, हे सरकारच्या हातात आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मी विनंती करतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेस यावे. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही. अन्यथा आम्ही मुंबईकडे निघालो आहोत. तिघांनी तोडगा काढावा.

Leave A Reply

Your email address will not be published.