Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडण सोडवल्याच्या रागातून तरुणाच्या गाडीची तोडफोड, परिसरात दहशत पसरवणाऱ्या 12 जणांवर FIR; रामनगर परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रामनवमी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात झालेले भांडण सोडवल्याच्या रागातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणाच्या गाडीची तोडफोड केली. तसेच दगडफेक करुन दहशत पसरवल्याचा प्रकार वारजे माळवाडी परिसरातील रामनगर येथील एकता सोसायटी सोमवारी (दि.22) रात्री अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सौरभ ज्ञानोबा चौधरी (वय-24 रा. एकता सोसायटी, मातोश्री निवासासमोर, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) याने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली. यावरुन वैभव गावडी, प्रकाश राठोड, महादेव झाडे, साहिल शेख यांच्यासह आठ ते दहा अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 323, 504, 506, 143, 147, 149, 336, 427, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद आणि आरोपी वैभव गावडी हे एकमेकांचे मित्र आहेत. सौरभ चौधरी याने सोमवारी रामनवमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी त्याने वैभव गावडी याला बोलावले होते. त्यामुळे गावडी हा त्याच्या इतर साथीदारांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी आला. त्याने फिर्यादी यांचा मित्र निरंजन माळी याला काहीही कारण नसताना हाताने मारहाण केली. तर गावडी याच्या इतर सहकाऱ्यांनी शिवीगाळ केली.

त्यावेळी फिर्यादी व त्याचा मित्र अभिषेक डोंगरदिवे हे वाद सोडवण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपी वैभव याने फिर्यादी यांना आमच्या भांडणात पडु नका नाहीतर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली.
सौरभ चौधरी याने भांडण सोडवल्याचा राग आरोपीच्या मनात होता.
रात्री अकराच्या सुमारास सौरभ हा त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी गेला होता.
त्यावेळी आरोपींनी सौरभच्या घरासमोर पार्क केलेल्या चारचाकी गाडीची तोडफोड करुन दगडफेक केली.
यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.