Tiger Deaths In India | भारतात साडेचार महिन्यांत 75 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात सर्वाधिक घटनांची नोंद

चंद्रपूर : Tiger Deaths In India | एकिकडे वाघांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबवल्या जात असताना, दुसरीकडे अवघ्या साडेचार महिन्यांत ७५ वाघांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे समोर आले आहे. यापैकी १२ एप्रिल ते १३ मे दरम्यान देशात १६ वाघांचा मृत्यू झाला. यापैकी आठ घटना मध्य प्रदेशात आणि पाच महाराष्ट्रात घडल्या आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात जानेवारी ते १३ मे या चार महिन्यांत वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार वा नैसर्गिकरित्या अशा विविध कारणांनी ७५ वाघांचे मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सर्वाधिक २३ मृत्यूची नोंद झाली आहे. या वर्षी देशात झालेल्या व्याघ्र मृत्यूंपैकी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये मिळून आतापर्यंत ६१ टक्के मृत्यू झाले. वाघांच्या वाढत्या मृत्यूबद्दल वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
बहेलिया आणि बावरिया टोळ्यांकडून मागील पाच वर्षांमध्ये भारतात शंभरहून अधिक वाघांच्या शिकारीच्या घटना घडवून आणण्यात आल्याचे समोर आले होते. जानेवारीत राजुऱ्यात बहुचर्चित बहेलिया टोळीला अटक करण्यात आल्यानंतर शिकारीच्या अनुषंगाने अनेक तथ्य समोर आले आहे. वाघांच्या अवयवांच्या तस्करीचे आंतरराष्ट्रीय नेटवर्कही उघडकीस आले आहे. रेल्वे अपघातांमध्ये वाढ झाल्याने सुरक्षित उपाययोजनांची गरजही अधोरेखित झाली आहे.
गेल्या साडेपाच वर्षांत वाघांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या २०२३ मध्ये झाली. गेल्या वर्षी ही संख्या १२४ होती. मात्र, यावर्षी अवघ्या साडेचार महिन्यांत वाघांच्या मृत्यूची संख्या ७५ वर पोहोचली आहे.