Bandra Fire News | वांद्रे : क्रोमा शोरूमला भीषण आग; लाखोंचे नुकसान

वांद्रे : Bandra Fire News | वांद्रे येथील लिंकिन रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे क्रोमा शोरूमचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी (२९ एप्रिल) पहाटे ४ वाजता आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.
लिंक स्क्वेअर मॉल ही चार मजली इमारत आहे. क्रोमा शोरूमच्या तळघरात आग लागली होती जी वरच्या मजल्यांवर पसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, वांद्रे येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या, मॉलच्या आत कोणीही अडकलेले नाही. या अपघातात दुकानदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
वांद्रे मॉलमध्ये आग लागल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकी म्हणाले की, ‘आम्ही पहाटे ४ वाजल्यापासून येथे आहोत. अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे ही आग पसरली, हे मी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो. बेसमेंटमधील क्रोमामध्ये एक छोटीशी ठिणगी पडली. आम्ही त्यांना आणखी पाणी आणण्याची विनंती केली, पण त्यांच्याकडे उपकरणे नव्हती. त्यांच्याकडे उपकरणे असली, तरी ती कशी वापरायची हे त्यांना माहित नव्हते. हे खूप दुर्दैवी आहे. मी वारंवार सांगत होतो की वर एक रेस्टॉरंट आणि सिलिंडर आहेत. पण, अग्निशमन विभागाने माझे ऐकले नाही. सामान्य नागरिकाला माहिती आहे की हा अग्निशमन दलाचा निष्काळजीपणा आहे, असे त्यांनी म्हटले.