Pune Crime News | सर्व्हिस रोडवर महिलांचे दागिने हिसकाविणारे चोरटे जेरबंद ! वारजे माळवाडी पोलिसांनी 2 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करुन तीन गुन्हे आणले उघडकीस

पुणे : Pune Crime News | मुंबई बंगलुरु या महामार्गावरील सर्व्हिस रोडवरुन जाणार्या एकट्या महिलांना हेरुन मोटारसायकलवरुन येऊन त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेणार्या दोघा चोरट्यांना वारजे माळवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त करुन ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Warje Malwadi Police)
आकाश आंबादास आंधळे (वय २४, रा. दांगट पाटीलनगर, शिवणे), आणि सुजल नरेश वाल्मिकी (वय २०, रा. दांगट पाटील इस्टेट, शिवणे) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. (Arrest In Robbery Case)
वारजे माळवाडी येथील महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर गेल्या साडेतीन महिन्यात तीन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचे प्रकार घडले होते. एक ८० वर्षाच्या ज्येष्ठ महिला दिगंबर वाडी येथे ७ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता मुलीबरोबर मोबाईलवर बोलत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ चोरुन नेली होती.
७२ वर्षाच्या ज्येष्ठ महिला २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता सोसायटीमधून स्कुटर आणण्यासाठी पती गेले असताना त्यांची वाट पहात बाहेर थांबल्या होत्या. यावेळी मोटारसायकलवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले. मंगळसुत्राचा अर्धा भाग चोरुन नेला होता.
एक ३७ वर्षांची महिला ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हैद्राबाद बिर्याणी हॉटेल ते राजमुद्रा हॉटेलकडे जाणार्या अंतर्गत सर्व्हिस रोडवरुन शेजारी राहणार्या महिलेबरोबर पायी जात होत्या. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेले होते.
या गुन्ह्यांना प्रभावी पायबंद घालण्यासाठी व हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. त्यांनी मागील दोन आठवड्यांपासून सातत्याने या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाचे सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारामार्फत माहिती काढून दिली. या माहितीच्या विश्लेषणातूनच पोलीस अंमलदार निखील तांगडे व अमित शेलार, यांना हे चोरटे वारजेतील एन डी ए ग्राऊंट येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने त्यांचा शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल असा २ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. तीन गुन्हे उघडकीस आणले आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार संजीव कळंबे, शरद वाकसे, अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ, गोविंद कपाटे, अमित जाधव, गणेश शिंदे यांनी केली आहे.