Pune Crime News | चितळे बंधुंच्या बनावट बाकरवडीची एक वर्षांपासून सुरु होती विक्री; ग्राहकांच्या तक्रारीनंतर झाले उघड, चितळे स्वीट होम च्या प्रमोद चितळेंवर गुन्हा दाखल (Video)

Pune Crime News | Chitale brothers' fake bakarwadi was being sold for a year; It was revealed after customer complaints, a crime was registered against Pramod Chitale of Chitale Sweet Home (Video)

पुणे : Pune Crime News | बाकरवडीसाठी गेल्या काही दशकापासून प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधु मिठाईवाले (Chitale Bandhu) यांच्या नावाने तब्बल एक वर्षांपासून बनावट बाकरवडी विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत चितळे बंधु मिठाईवाले यांच्या कडून नितिन अभिमन्यु दळवी (वय ३५) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन चितळे स्वीट होमचे (Chitale Sweet Home) मालक प्रमोद प्रभाकर चितळे Pramod Prabhakar Chitale (रा. सदाशिव पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सुमारे एक वर्षांपासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितळे बंधु मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील रांजे येथे बाकरवाडी तयार करण्याचा मुख्य प्लांट आहे. याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवि कॉलनी, मुकुंदनगर या ठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिट आहे.

गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधु मिठाईवाले यांना बाकरवडीची चव बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत फिर्यादी यांनी बाजारात मिळणार्‍या काही ठिकाणाहून चितळे स्वीट होम नावाने विक्रीस असणार्‍या बाकरवडीची पाकिटे खरेदी केली. चितळे स्वीट होम नावाने असणारी बाकरवडीची पाकिटे आणि चितळे बंधुच्या नियमित तयार होणार्‍या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली. तसेच त्या पाकिटावर चितळे बंधु मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर व वेबसाईट हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसून आले.

अशाप्रकारे ‘चितळे स्वीट होम’चे प्रोपा प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधु मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वत:चे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर वापरले. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करुन चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे.

चितळे स्वीट होम चे मालक आणि चितळे बंधु मिठाईवाले यांचा काहीही नातेसंबंध नाही. चितळे स्वीट होम चे प्रमोद चितळे यांचे नागनाथ पार येथे दुकान आहे. गेल्या एक वर्षांपासून त्यांनी बनावट बाकरवडी तयार करुन चितळे बंधुच्या नावाचा वापर करीत असल्याचे आढळून आल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती, असे फिर्यादी नितीन दळवी यांनी सांगितले.

चितळे बंधु मिठाईवाले यांच्या व्यवसायाला नुकतीच ७५वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांनी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना ब्रँड अँबॅसिटर बनवून मोठ्या प्रमाणावर जाहिरात मोहिम राबविली होती.

कमी दर्जाची किंवा योग्य चव नसलेली बाकरवडी मिळत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांकडून येत होत्या. या तक्रारींची खातरजमा केली असता हा प्रकार उघडकीस आला. आमचे ग्राहकांना आवाहन आहे की, चितळेचे कोणतेही उत्पादन घेताना ते खरे आहे की बनावट हे त्या उत्पादनावर असलेल्या माहितीच्या आधारे तपासावे. तसेच शक्यतो आमच्या अधिकृत केंद्रावरून किंवा संकेतस्थळावरूनच खरेदी करावी. ग्राहकांची फसवणूक होऊ नये या उद्देशातून आम्ही ही तक्रार दिलेली आहे.

  • इंद्रनिल चितळे, भागीदार, चितळे बंधू मिठाईवाले