Gujrat Drug Boat Seized | गुजरातच्या समुद्रात तब्बल 1800 कोटींचा ड्रगसाठा जप्त; बोटीमध्ये होते 300 किलो एमडी ड्रग्ज

नवी दिल्ली : Gujrat Drug Boat Seized | गुजरातमधील समुद्रामध्ये कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त कारवाईमध्ये तब्बल १८०० कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडली आहे. सुमारे ३०० किलो एमडी ड्रग्ज या बोटीतून जप्त केले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर समुद्रात करण्यात आली.
ही बोट रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तानच्या दिशेने भारतात येत होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोस्ट गार्डच्या स्पीड बोट्स आणि मोठ्या जहाजांनी कारवाई करत ही बोट थांबवली. तिची कसून तपासणी केली असता बोटीत ड्रग्स ही मेथॅम्पेटामिन असल्याचे समोर आले. ही अत्यंत घातक आणि महागडी ड्रग आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किमत सुमारे १८०० कोटी रुपये आहे. १२ आणि १३ एप्रिलला रात्री केलेल्या कारवाईत तटरक्षकाला रात्रीच्या काळोखात एक संशयित बोट जवळ येत असल्याचे आढळले.
सतर्क झालेल्या तटरक्षकाने संशयित बोटीचा पाठलाग केला. त्यावेळी समुद्रात टाकण्यात आलेले अंमली पदार्थ आढळल्याची माहिती आहे. त्यानंतर जप्त केलेले अंमली पदार्थ पुढील तपासणीसाठी आयसीजी जहाजाने पोरबंदरला आणण्यात आले. कारवाईदरम्यान बोटीत असलेल्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, जहाजातील कर्मचाऱ्यांनी ५ दिवसांपासून समुद्रात असल्याचा दावा केला असला, तरी बोटीत मासेमारीचे कोणतेही साहित्य नव्हते आणि मासे पकडण्याचे साधनही आढळले नाही. त्यामुळे गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डच्या संयुक्त कारवाईत सापडलेली बोट तस्करीसाठीच वापरण्यात आल्याचे समोर आले आहे.