Satara Crime News | तरुणीने आईच्या मदतीने केली धारदार शस्त्राने प्रियकराची हत्या, त्यानंतर अपघाताचा केला बनाव, कारमध्ये बॉयफ्रेंडचा मृतदेह टाकून ती कार कालव्यात ढकलली

सातारा : Satara Crime News | तरुणीने आईच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. योगेश पवार (वय-२८) असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर रोशनी माने असे आरोपी तरुणीचे नाव असून पार्वती माने असे तरुणीच्या आईचे नाव आहे. ही घटना माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक गावामध्ये घडली. हत्या करून अपघाताचा बनाव करण्यात आला. कारमध्ये बॉयफ्रेंडचा मृतदेह टाकून ती कार कालव्यामध्ये ढकलून दिली. याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली. (Murder Case)
अधिक माहितीनुसार, योगेश आणि रोशनीचे प्रेमसंबंध होते. योगेशने तिला लाखो रुपये उसने दिले होते. योगेशने रोशनीकडे पैसे परत मागितले. त्यामुळे संतापलेल्या रोशनीने १८ मार्च रोजी योगेशला नरवणे येथे बोलावून घेतले. त्याच ठिकाणी योगेशची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून फडतरी येथील कॅनॉलमध्ये फेकला.
योगेशचा भाऊ तेजसने मंगळवारी संध्याकाळपासून भाऊ गायब असल्याची पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. कारसोबत योगेश गायब झाला होता. त्याचा फोनही बंद लागत होता. त्यामुळे घातपात झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्याचे शेवटचे लोकेशन असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. त्याठिकाणी असलेल्या कॅनॉलमध्ये पोलिसांना योगेशची कार बुडाल्याचे आढळून आले. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढली असता त्यामध्ये त्यांना योगेशचा मृतदेह आढळून आला.
रोशनी आणि तिच्या आईसह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रोशनी, तिची आई पार्वती आणि दोन साथीदारांना अटक केली आहे. उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.