Pune Crime News | सराईत गुन्हेगार, तडीपार एकाच फ्लॅटमध्ये जमून आखत होते मोठा कट ! खंडणी विरोधी पथकाने चौघांकडून 4 पिस्टल, 8 जिवंत काडतुसे जप्त (Video)

पुणे : Pune Crime News | वाघोली येथील राजेश्वरी नगरी मधील आलोवेरी सोसायटीतील एका फ्लॅटवर रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार आरोपी असे मिळून मोठा कट आखण्यासाठी एकत्र जमले होते. खंडणी विरोधी पथकाने तेथे छापा घालून चौघांना पकडले. त्यांच्याकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

गोपाळ संजय यादव (वय २४, रा. वाघोली) याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, राईट असे एकूण २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (वय २३, रा. वाघोली) याच्यावर अहिल्यानगर येथे तसेच लोणीकंद पोलीस ठाणे येथे आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा व तडीपार याप्रमाणे ३ गुन्हे दाखल आहेत.

इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, रा. वाघोली) यांच्यावर मोक्का, दरोडा, आर्म अ‍ॅक्ट, तडीपार असे गंभीर स्वरुपाचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. देवानंद शिवाजी चव्हाण (वय २३, रा़ मारुती आळी, शिरुर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गौरव देव व पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर यांना बातमी मिळाली की,वाघोलीतील एका फ्लॅटमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार एकत्र जमले असून त्यांच्याकडे शस्त्रे आहेत. या बातमीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वाघोली येथील राजेश्वरीनगरीमधील आलोवेरी सोसायटीतील एका फ्लॅटवर छापा टाकला. तेथे हे चार सराईत गुन्हेगार आढळून आले. घराची झडती घेतली असता त्यांच्याकडून ४ पिस्टल व ८ काडतुसे असा १ लाख ६४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी छापा घातलेल्या फ्लॅटमध्ये गोपाळ यादव हा भाड्याने रहात असल्याचे सांगतो. तिघे त्याचे मित्र असून हडपसर येथे एका मित्राचे लग्नासाठी ते आले होते. त्यांनी स्व: रक्षणासाठी पिस्टल बाळगली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, सहायक पोलीस फौजदार सुनिल पवार, पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर, चेतन आपटे, अजिनाथ येडे, अमोल घावटे, अमोल राऊत, सैदोबा भोजराव, सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, दिलीप गोरे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी केली आहे.