Yerawada Pune Crime News | पडक्या घरात ठाकरेंच्या शाखा प्रमुखांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वडिलांचा गंभीर आरोप

पुणे : Yerawada Pune Crime News | एका पडक्या घरात १८ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. साहिल विलास कांबळे (वय- १८ मुळ रा. देवरूकपूर बौध्दवाडी जि. रत्नगिरी, सध्या- धानोरी, पुणे) असे मृत तरूणाचे नाव आहे. प्रादेशिक मनोरूग्णालय येरवडा जुन्या वसाहत मधील एका पडक्या घरात १७ मार्चला हा मृतदेह आढळून आला.
अधिक माहितीनुसार, साहिल कांबळे हा तरुण शनिवार पेठ मध्ये प्रिटींग प्रेसमध्ये काम करत होता. विलास कांबळे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विश्रांतवाडी शाखा प्रमुख आहेत. १६ मार्चला दुपारी साहिलला धमकीचे फोन येत असल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलिस ठाणे हद्दीतील साप्रस पोलिस चौकीत देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. यानंतर त्याचे अपहरण झाले. तेव्हाही तक्रार दिली तरी पोलिसांनी कोणती भूमिका घेतली नाही,असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
१७ मार्चला येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनोरूग्णालयाच्या पडक्या घरात दोरीने लटकलेला साहिलाचा मृतदेह आढळला. त्यावेळी त्याचे पाय जमीनीवरच होते. शिवाय तोंडाला माती लागलेली दिसली. ही आत्महत्या नसून याचा खून झाल्याचा आरोप विलास कांबळे यांनी केला आहे.
साहिलचे वडील विलास कांबळे म्हणाले, धमक्याचे फोन येत असल्याचे पोलिसांना सांगूनही त्यांनी कोणताच तपास केला नाही. धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा परिसरात मोठ्या गुन्हेगार टोळ्या सक्रीय आहेत. याच्यावर पोलिसांनी कारवाई करून गुन्हेगारांना पकडून खाक्या दाखविला पाहिजे. तरुण पिढी व्यसनी होत आहे. सर्वत्र अमली पदार्थ आणि गांजाची विक्री होत आहे. हे पोलिसांना माहिती असून कोणतीही कारवाई केली जात नाही. ही खंत आहे. खुनातील आरोपींना तत्काळ अटक करावी, असे विलास कांबळे यांनी म्हंटले आहे.