Sangli Crime News | शेतात खांब रोवण्यावरून वाद, 22 वर्षीय सख्ख्या चुलत भावाला कोयत्याने वार करत संपवलं

सांगली : Sangli Crime News | कर्नाळ (ता- मिरज) येथे जमीन हद्दीकरिता शेतात खांब रोवण्याच्या कारणावरून सख्ख्या चुलत भावावर कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. सत्यजित विकास कांबळे (वय-२२, रा-कर्नाळ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विकास बाबूराव कांबळे (वय-५६, रा. कर्नाळ) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे. (Murder Case)
संशयित शुभम शैलेश कांबळे (वय-२४), सोमेश शैलेश कांबळे (वय-१९), स्वराज ऊर्फ कुणाल बाळासाहेब कांबळे (वय-२१, सर्व रा. जुन्या पाण्याच्या टाकीजवळ, कर्नाळ) आणि हणमंत दिगंबर गायकवाड (१८ वर्षे ४ महिने, रा. समर्थ कॉलनी, शंभर फुटी रस्ता, सांगली) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच याप्रकरणी एका अल्पवयीन विद्यार्थ्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.१८) सायंकाळी चारच्या सुमारास विकास कांबळे आणि त्यांचा मुलगा सत्यजित हे कर्नाळ ते डिग्रज रस्त्यालगत असणाऱ्या त्यांच्या शेतजमिनीचे हद्दीत खांब लावत असताना तेथे संशयित हातात कोयता आणि काठ्या घेऊन आले. संशयितांनी दोघांना, तुम्ही हद्दी कायम करण्यासाठी शेतात खांब का लावत आहात, अशी विचारणा करून वाद घातला.
यावेळी संशयित शुभम याने त्याच्याकडील कोयत्याने सत्यजित याच्या डोक्यात पाठीमागे दोन वार केले. शुभम याने केलेला तिसरा वार सत्यजित याने चुकविला, मात्र संशयित कुणाल कांबळे याने त्याच्याकडील काठीने सत्यजितला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेला सत्यजित खाली कोसळला. यावेळी सत्यजित याला वाचविण्यासाठी त्याचे वडील विकास कांबळे, तसेच सत्यजित याचे घटनास्थळावर उपस्थित असलेले नातेवाईक वाद मिटवण्यासाठी पुढे आले. मात्र त्यांच्यावरही संशयितांनी हल्ला चढवून त्यांना जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या सत्यजितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.