Pune Crime News | पुण्यात मोठ्या प्रमाणात भांगयुक्त बंटा गोळ्यांची विक्री; किराणा दुकानदाराकडुन 4 किलो 800 ग्रॅमची 24 पाकिटे जप्त

पुणे : Pune Crime News | पुणे शहरामध्ये भांगयुक्त बंटा गोळ्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अनेक ठिकाणी छापेमारी करुन एका किराणा दुकानदाराला पकडले. (Pune Crime Branch News)

दिनेश मोहनलाल चौधरी Dinesh Mohanlal Chaudhary (वय ३०, रा. राधाकृष्ण अपार्टमेंट, देशमुखवाडी, शिवणे) असे या किराणा दुकानदाराचे नाव आहे. त्याकडे नायलॉन पोत्यामध्ये भांग युक्त बंट्याच्या गोळ्या असलेले एकूण २४ पॅकेट मिळाली. प्रत्येक पाकिटाचे वजन २०० ग्रॅम असा एकूण १० हजार ८०० रुपयांचा ४ किलो ८०० ग्रॅम वजना अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.

पुणे शहरामध्ये भांगयुक्त बंटा गोळ्यांची विक्री होत असल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्याची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी शहरातील अनेक पान टपर्‍यांमध्ये तपासणी केली. त्यातून पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस अशा भांग युक्त बंटा गोळ्यांची विक्री करणार्‍याचा शोध घेत असताना शिवणे येथील कॅनॉल रोडला साई सृष्टी रेसिडेन्सी समोरील रोडवर दिनेश चौधरी हा जाताना दिसला. पोलिसांनी त्याला पकडले असता त्याच्याकडील पोत्यात भांगयुक्त बंटा गोळ्यांची पाकिटे मिळाली.

दिनेश चौधरी हा मुळाचा राजस्थानचा असून गेल्या ४ ते ५ वर्षांपासून पुण्यात आला असून त्याचे किराणा दुकान आहे. त्याने या भांगयुक्त बंटा गोळ्या कोठून आणल्या व कोठे विक्री करत होता, याचा पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, संदिप शिर्के, विपून गायकवाड, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.