Nashik Crime News | दोन सख्ख्या भावांचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत निघृण खून; मृतांपैकी एकजण राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी

नाशिक : Nashik Crime News | दोन सख्ख्या भावांचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत निघृण खून केल्याची घटना समोर आली आहे. उमेश उर्फ मन्ना जाधव व प्रशांत जाधव, अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत. उमेश हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी होता. ही घटना बुधवार (दि.१९) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. (Murder Case)

अधिक माहितीनुसार, शहरात रंगपंचमीचा जल्लोष सुरु होता. रात्री शहर झोपी जात असताना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडीमध्ये एका सार्वजनिक शौचालयासमोर कोयतेधारी हल्लेखोरांनी जाधव बंधुवर जोरदार हल्ला चढविला. एकापेक्षा अधिक वार केल्याने दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

त्यानंतर परिसरातील तरुणांनी दोघांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अति रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. हल्लेखोर फरार झाले असून चार पथके त्यांच्या शोधासाठी रवाना केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे.