Pune Crime News | वकिलाचे अपहरण नाही तर दारु पिऊन मोटारसायकल चालविताना अपघात होऊन जखमी; पोलिसांचा दावा, दारु विकत घेतानाचा व्हिडिओ पोलिसाकडून प्रसारित (Video)

पुणे : Pune Crime News | स्वारगेट येथील बलात्काराच्या (Swargate Rape Case) घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याचा वकिल साहिल डोंगरे याने आपले अपहरण करुन दिवे घाट नेले व तेथे मारहाण केल्याचा दावा केला होता. याबाबत हडपसर पोलिसांनी केलेल्या तपासात असा अपहरणाचा कोणताही प्रकार घडला नाही तर, अ‍ॅड. साहिल डोंगरे (Adv Sahil Dongre) हे दारु पिऊन बाहेर पडले व मोटारसायकलवरुन जात असताना ते त्यावरुन पडून जखमी झाल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले आहे.

साहिल डोंगरे आणि त्यांचा मित्र अनिकेत मस्के हे गाडीतळ येथील सागर बारमध्ये १७ मार्च रोजी रात्री १० वाजता गेले होते. तेथून बाहेर पडताना ते दिसत आहेत. बार मधून अनिकेत मस्के हा घरी गेल्याचे सांगत आहे. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साहिल डोंगरे हे रात्री साडेअकरा ते १८ मार्च पहाटे ५ वाजेच्या दरम्यान दिवे घाट येथे असल्याचे दिसून आले. डायल १०८/१०२ वर कॉल झाल्याचे व सासवड पोलीस ठाण्यातील अंमलदार यांना कॉल झाल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. परंतु आगीचा कॉल आल्याने ते या कॉलला जाऊ शकले नाही. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केलेल्या कॉलरशी पोलिसांनी संपर्क केल्यावर त्याने सांगितले की त्यांचे समोर बाईकस्वाराचा अपघात झाला व तो स्वत: मोटारसायकलवरुन पडून जखमी होऊन त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याने कॉल केला होता.
डोंगरे यांनी १८ मार्च रोजी स्वत: १०८ वर कॉल करुन त्यांचा अपघात झाल्याचे सांगितले. त्यानंतर सासवड ग्रामीण आरोग्य रुग्णालयाची रुग्णवाहिका आली व साहिल डोंगरे यांना पुढील उपचारासाठी घेऊन गेली. जखमी साहिल डोंगरे हे हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सकाळी ९ वाजता आले. जखमी होऊन उपचार घेतल्याबाबत काही एक सांगितले नाही. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक कुदळे यांनी मेडिकल यादीसह पोलीस अंमलदार यांच्यासोबत त्यांना ससून रुग्णालयात पाठविले. हे सर्व पाहता साहिल डोंगरे यांचे अपहरण झाले नसून त्यांचा रस्ते अपघात झाला असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. साहिल डोंगरे हा ससून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.