Pune Police News | शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ‘फीड’ पुणे पोलिसांच्या ‘कंट्रोल’मध्ये; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सोयीचे होणार

Pune Police CCTV

पुणे : Pune Police News | शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे मेट्रोकडील २ हजार २५५, स्मार्ट सिटी कंपनीकडील ४३०, पुणे महापालिकेकडील २ हजार ४३३ आणि पुणे पोलिसांचे १ हजार ३४१ असे ६ हजार ४५९ ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांना शहराच्या वेगवेगळ्या भागांवर चोवीस तास लक्ष ठेवता येणार आहे. या सर्व कॅमेऱ्यांचे ‘फीड’ पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षास उपलब्ध करून दिल्याची माहिती गृह मंत्रालयाने सोमवारी (दि.१७) विधानसभेत दिली.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शहरातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला. पुणे पोलिसांच्या दिमतीला साडेआठ हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे देण्यात आले असले तरी अनेक ठिकाणचे कॅमेरे नादुरुस्त आहेत. त्याचा फटका तपास यंत्रणांसह नागरिकांच्या सुरक्षिततेला बसतो आहे. वेगवेगळ्या यंत्रणांकडून बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचा वापर पुणे पोलिसांना करता यावा. तसेच या कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीबाबत सरकारने विधिमंडळातून धोरण तयार करावे, अशी मागणी शिरोळे यांनी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरामध्ये पुणे पोलिस दलाच्या वतीने ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामधील पहिल्या टप्पात १ हजार ३४१ तर, दुसऱ्या टप्प्यात २ हजार ८८६ अतिरिक्त कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये ‘एआय’चा समावेश असणार आहे.

शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात अत्याधुनिक ‘इंटिग्रेटेड कमांड सेंटर आणि कंट्रोल रूम’ उभारण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे प्रस्तावित आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ४३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.